औरंगाबाद - राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने काँग्रेसला सत्तेत स्थान मिळाले. त्यामुळे आता शिवसेनेची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ संपला असून या पदावर आता काँग्रेसने दावा केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत येण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणीला सुरुवात औरंगाबादचे जिल्हापरिषद अध्यक्षपद आणि महानगर पालिकेच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसने मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून सत्तेत स्थान मिळेल असा विश्वास काँग्रेसला वाटतोय. तर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाचा भाजपने राजीनामा दिला असून, त्यावर देखील काँग्रेसचा दावा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात नव्या आघाडीमुळे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मागील अडीच वर्षांपासून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकत्रित सत्ता आहे. हेच समीकरण राज्यात अस्तित्वात आल्याने या ठिकाणीही जागावाटपाचा तिढा वाढणर आहे.
अडीच वर्षांचा शिवसेनेचा कार्यकाळ संपल्याने आता स्वपक्षाचा अध्यक्ष होणार, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर पाण्याच्या मुद्द्यावरून भाजपचे नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा देत भाजपने महानगर पालिकेतील युती तोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे पालिकेत उपमहापौर पदासह इतर पदांवर काँग्रेसकडून दावा करण्यात येतोय. तसेच यासाठी काँग्रेसकडून वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले. याबाबत शिवसेनेने अद्याप भूमिका स्पष्ट केली नसली; तरीही काँग्रेसने डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील जिल्हापरिषदेत अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.