औरंगाबाद- अंगणवाडी सेविकेंच्या वतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलक अंगणवाडी सेविका या बंद पडलेले मोबाईल बालकल्याण समिती कार्यालयात फेकण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांसोबत हा संघर्ष झाला.
खराब मोबाईलची काढली अंत्ययात्रा-
अंगणवाडी सेविकांना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेले मोबाईल खराब असल्याची तक्रार अनेक वेळा करण्यात आली, आंदोलनही करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासानाच्या भोंगळ कारभारास संतापून या अंगणवाडीसेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यासाठी त्यांनी खिकडपुरा येथील आयटक कार्यालयातून खराब मोबाईलची अंत्ययात्रा काढून सरकारी धोरणांनाचा निषेध व्यक्त केला. अंगणवाडी सेविकेंना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट असून त्यांची दुरुस्ती करण्याचा खर्च देखील परवडणारा नसल्याच्या तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्याबाबत सकारात्मक विचार न केल्याने आज आंदोलन केल्याची माहिती आयटकचे नेते कॉ. राम बाहेती यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांचे आंदोलन; पोलिसांसोबत झाली झटापट मोबाईलची केली शोकसभा-जिल्हा परिषद येथे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसीसाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी खराब झालेल्या मोबाईलची अंत्ययात्रा काढल्यावर त्यांची शोकसभा यावेळी घेण्यात आली. जुने खराब मोबाईल घेऊन चांगले मोबाईल द्यावेत. त्या मोबाईलमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा जेणेकरून मराठीमध्ये कामकाज करता यावे, अशी मागणी आंदोलक अंगणवाडी सेविकांनी केली.
हेही वाचा - येवल्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन, नवीन मोबाईलची मागणी
हेही वाचा - कोल्हापुरातील हजारो अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेवर धडक, मोबाईल केले परत