औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. कोरोनाचे सावट असल्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत मिरवणूक न काढता अभिवादन करून साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
औरंगाबादेत साध्या पद्धतीने पण उत्साहात आंबेडकर जयंती साजरी
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असतात. हजारोंचा समुदाय आदल्या दिवशी रात्रीपासून येताना दिसून येत होते.
शहरात अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त शहरातही विविध पुतळ्यांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यात भडकलगेट, विद्यापीठ गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर त्याचबरोबर मिल कॉर्नर येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी अनुयायांनी केली. यावेळी जमलेल्या अनुयायांनी जोरदार जयघोष केला. तर गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले असतांना अशा परिस्थितीत कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास सध्यस्थीत बंदी आहे. याच कारणास्तव यावर्षी नागरिकांनी सध्या लागू असलेला कलम 144 कायदा पाळत खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'कायदा पाळा, कोरोना टाळा' अशी रांगोळी आपापल्या दारापुढे तसेच चौकात काढून अभिवादन केले. सोशल मीडियावर काढलेल्या रांगोळ्यांचा फोटो पाठवत अनोखे अभिवादन देण्यात आले. कॉ. रतन आंबिलवादे, कॉ. विठ्ठल त्रिभुवन, कॉ. किशोर सोनवणे, कॉ. योगेश वाहुळ, कॉ. राहुल ताकवले, प्रदीप सोनवणे, भगवान सोनवणे, नितनवरे, लक्षमन बागुल, लक्ष्मण बर्वे आदींनी आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून रांगोळी काढण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन