औरंगाबाद - आजकालची लहान मुल कमालीची हुशार असतात असे म्हणतात. मात्र, त्याचा प्रत्यय औरंगाबादेत आला. रात्री सायकल खेळत असताना एका घरात चोर शिरल्याचं दोन चिमुकल्यांना दिसले. घाबरून न जाता त्यांनी शेजाऱ्यांना आणि आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे काही क्षणात अट्टल घरफोड्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या सर्कतेमुळे अट्टल चोर जेरबंद - औरंगाबाद पुंडलिक नगर पोलीस ठाणे बातमी
दोघा चिमुकल्यानी दिलेल्या माहितीमुळे आसपासचे नागरिक घराभोवती जमा झाले. पोलिसांनी घराच्या आवारात प्रवेश केला असता दाराचा कडीकोंडा तुटलेला होता. पोलिसांनी झाडाझडती सुरू केली मात्र कोणीच आढळून आले नाही. त्याचवेळी कोणीतरी खिडकीला बाहेरून लटकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ त्या चोराला वर ओढत ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण चोरी करायला आल्याचे सांगितले.
![औरंगाबादमध्ये लहान मुलांच्या सर्कतेमुळे अट्टल चोर जेरबंद burglary arrested by aurangabad police due to childrens alertness](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9063163-576-9063163-1601915924201.jpg)
पोलिसांनी दिलेल्या नाहीतीनुसार अटक करण्यात आलेला चोर अट्टल घरफोड्या आहे. याआधी त्याच्यावर सात ते आठ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चोराला अटक केली असून दोनही मुलांनी दाखवलेल्या हुशारीचे त्यांनी कौतुक केले. इतक्या लहान वयात त्यांनी दाखवलेली समयसुचकता त्यामुळे अट्टल घरफोड्या अटक झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. आजची पिढी चाणाक्ष, बुद्धिमान आणि सतर्क असल्याचे नेहमी बोलले जाते. त्याचा प्रत्यय यथार्थ जंजाळ आणि श्रेयस झाल्टे यांच्या कृतीमुळे दिसून आला हे नक्की.