औरंगाबाद -त्रिपुरामध्ये (Tripura Violence) झालेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात दगडफेक करण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाजांच्या विषयी सद्भावना असलेले सरकार राज्यात आहे. कायदा सुव्यवस्थेला असे संकट निर्माण करून काय सिद्ध करतात. त्रिपुरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आम्हाला चिंता आहे. राज्यात शांतता असावी अशी आमची भूमिका आहे. जे काही घडतंय ते त्याच्या ठिणग्या महाराष्ट्रात उडू नये. या प्रकरणात भाजपाने घेतलेली भूमिकेमुळे असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे देशात सर्वच ठिकाणी अशांतता अस्थिरता निर्माण होऊन त्यातून 2024 च्या निवडणुकांमध्ये भाजपाला उतरायचा आहे असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे.
औरंगाबादेत केंद्राविरोधात विराट मोर्चा -
केंद्र सरकारच्या विरोधात निषेध म्हणून विराट मोर्चाचे आयोजन औरंगाबादमध्ये केले आहे अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. फक्त औरंगाबादमध्येच नाही तर देशभरात महागाईची परवड बसत आहे. मात्र कोणीही आवाज उठवायला तयार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रात आंदोलन केले हा मोठा विनोद आहे. महागाईच्या निर्मात्यांनी महागाई विरोधात आंदोलन करावे हे आश्चर्य आहे. मात्र औरंगाबादमध्ये होणारे आंदोलन मराठवाड्यातून महागाई बाबत आक्रोश राज्यकर्त्यांनी पर्यंत पोहोचणार आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.