औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सांगितले की, भाजपमुळे देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. कारण अरब देशांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य ( Prophet remarks controversy ) केल्याबद्दल भारताकडे माफी मागायची मागणी केली. हे सर्व भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे घडले, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल ( Uddhav Thackeray on Prophet controversy ) केला.
औरंगाबाद येथील सभेत ते बोलत होते. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर ते म्हणाले की, मध्यपूर्व आणि अरब देशांनी आमच्या देशाला गुडघे टेकवून आम्हाला माफी मागायला भाग पाडले. "हे कशामुळे घडले? भारताने माफी का मागितली पाहिजे. देशाने असे काय केले? हा गुन्हा भाजप आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे," असे ठाकरे म्हणाले. "भाजपचे प्रवक्ते किंवा भाजपने बोललेले शब्द कोणत्याही मुद्द्यावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. भाजपच्या प्रवक्त्याने वापरलेल्या शब्दामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली गेली. त्यामुळे भाजपची नव्हे तर माझ्या देशाची प्रतिमा खराब झाली.," असेही ठाकरे म्हणाले.