औरंगाबाद- महानगरपालिकेच्या सत्तेतून भाजप अखेर बाहेर पडली. पाणी योजना स्थगित केल्याच्या कारणावरून भाजपने शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. जोपर्यंत पाणी योजना मंजूर होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला कुठल्याच प्रकारचे सहकार्य करणार नाही, अशी भूमिका भाजपने जाहीर केली.
औरंगाबाद महापालिकेत सेना-भाजप युती तुटली हेही वाचा -धक्कादायक..! अज्ञात व्यक्तीची शाळकरी मुलींना मारहाण; अजिंठ्याच्या शाळेतील प्रकार
औरंगाबाद शहरासाठी युती सरकारच्या काळात 1 हजार 680 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, नवीन सरकारने त्या योजनेला स्थगिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एक बैठक घेत महानगरपालिकेत असलेली सर्व पद सोडून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडायचा निर्णय घेतला. त्याबाबत माजी राज्यमंत्री आमदार अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेत अधिकृत घोषणा केली.
हेही वाचा -कन्नडमध्ये 'कॅब'विरोधात तहसील कार्यालयावर शांतता मोर्चा
औरंगाबाद शहरात पाण्याची भीषण समस्या असल्याची ओरड नागरिक नेहमीच करतात. त्यामुळे राज्यमंत्री झाल्यावर अनेक दिवस पाठपुरावा करून औरंगाबाद शहरासाठी नवीन पाण्याची योजना राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली होती, अशी माहिती आमदार अतुल सावे यांनी दिली. मोठ्या प्रयत्नानंतर मंजूर झालेली पाण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगित केली. त्यामुळे आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची भाजपची तयारी नाही. याच कारणावरून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत महानगरपालिकेत भाजपकडे असलेली सर्व पदं सोडून विरोधी पक्षाची भूमिका घ्यायची, असा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत पाण्याची योजना पुन्हा मंजूर केली जात नाही, तोपर्यंत महानगरपालिकेत शिवसेनेला कुठल्याही प्रकारचे सहकार्य भाजप करणार नाही, असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. तसेच स्थगित केलेली पाण्याची योजना लवकर सुरू करण्यात आली नाही, तर शिवसेनेच्या विरोधात भाजपचे नगरसेवक आंदोलन करतील, असे देखील नगरसेवकांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात राज्यासह औरंगाबाद शहरात शिवसेना आणि भाजप आपला संघर्ष हा स्पष्टपणे दिसून येईल यात शंका नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल हे नक्की.