औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना, वाळूज औद्यगिक वसाहतीमधील बजाजमध्येही २५० अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी बजाज व्यवस्थापनाने आता लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांचे ५० टक्के वेतन कपात करण्यचा निर्णय घेतला आहे. तशी नोटीसच बजाजच्या व्यवस्थापनाने काढली आहे. कोविडचा प्रादुर्भाव पाहता कंपनीने काही तात्पुरते बदल केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बजाज कामगारांच्या वेतनाला लावणार कात्री शहरात आणि औद्योगिक वसाहतीत वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता शहरात 10 जुलै ते 18 जुलै संचारबंदीचे नियम जनता कर्फ्युच्या माध्यमातून लावण्यात येणार आहेत. याकाळात केवळ दूध आणि पेपर वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये उद्योग देखील बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर बजाज कंपनी व्यवस्थापकांनी मात्र, या काळात कामावर नसणाऱ्या कामगारांचे पन्नास टक्के वेतन कपात करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत.
औरंगाबादच्या वाळूज येथील बजाज कंपनीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचे दिसून आले. बाधित रुग्णांची संख्या जवळपास 250 च्या वर गेली आहे. त्यानंतर सामाजिक स्तरातून मोठी टीका होत होती. त्यानंतर आता वेतन कपातीच्या नव्या आदेशामुळे कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या कायद्यांप्रमाणे नियम आजच्या काळात पाळणे योग्य नाही. आज गरजेच्या वेळी कंपनीने कामगारांना साथ द्यायला हवी, असे मत भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रभाकर मते पाटील यांनी व्यक्त केले.
बजाजने दिलेल्या नोटीसमध्ये कोरोनामुळे आजारी असलेल्या कामगारांना किंवा अलगिकरण करण्यात आलेल्या कामगारांना पूर्ण वेतन मिळेल. मात्र ते देत असताना शिल्लक असलेल्या सुट्ट्या वळती करून घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
कामगार आणि कंपनी ही धनशक्ती आणि श्रमशक्ती अशी जोडी आहे. आज कामगारांचा गरज असताना असे नियम कंपन्यांनी लावायला नको. आजपर्यंत याच कामगारांनी कंपनी उभारणीत आपला सहभाग दिला आहे. कोरोनाचा काळ गेल्यावर ती पुन्हा आपल्या मेहनतीने कंपनीला उभारी देणारच आहे. त्यामुळे आज असे आदेश काढणे चुकीचे असल्याचे मत भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते यांनी व्यक्त केले.
कंपनीतून कामगार कपात आणि वेतन कपात करण्याची संधी कारखानदारांना पाहिजे असते. लॉकडाऊन हे त्यांना निमित्त मिळाले, कारखानदारांनी कामगारांवर असा अन्याय करू नये, असे मत आयटक संघटनेचे संघटक अॅड अभय टाकसाळ यांनी व्यक्त केले.