औरंगाबाद -औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद शहराचे नाव आहे. हे नाव बदलून शहराची ओळख बदलेल का? आजपर्यंत ज्या जिल्ह्यांची नाव बदलली तिथे काही फरक पडला नाही, मग नाव बदल्याचे राजकारण का? असा प्रश्न इतिहासतज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, औरंगाबादेत नावावरून राजकारण नको तर विकास कामावरून राजकारण व्हायला हवे.
औरंगजेबाच्या अनेक पाऊलखुणा - औरंगाबादच्या निर्मितीत मलिक अंबर याचा मोठा वाटा आहे. त्यावेळी शहराचे नाव खडकी असे होते. मात्र नंतर औरंगजेबाने प्रदेश जिंकल्यावर फतेहनगर, आणि नंतर औरंगाबाद अशी नाव बदलत गेली. मध्ययुगात दख्खनचे प्रवेशद्वार अशी ओळख भागाला होती. औरंगजेबाच्या कार्यकाळातील अनेक पाऊलखुणा शहराची ओळख निर्माण करतात. ज्यामध्ये जुन्या शहरातील असलेल्या भागांना देण्यात आलेल्या औरंगजेब यांच्या सरदारांची नाव हे देखील इतिहासाचा भाग आहे. मग ही ओळख देखील मिटवणार का? असा प्रश्न इतिहासतज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी उपस्थित केला.
संजय पाईकराव यांची प्रतिक्रिया 52 पुऱ्याचे नाव कसे बदलणार -औरंगाबाद ऐतिहासिक शहर म्हणून परिचित आहे. तसेच या भागातील 52 पुरे म्हणजेच भागांच्या नावांचे शहर म्हणून वेगळी ओळख आहे. औरंगजेब ज्यावेळी औरंगाबादेत आला. त्याचे साम्राज्य येथून चालू लागले. त्यावेळी अनेक सरदार आसपास वास्तव्य करू लागले. ज्यामध्ये राजपूत सरदार मोठ्या प्रमाणात होते. हे सरदार ज्या ठिकाणी राहत होते. त्यांनी औरंगजेबासाठी अनेक युद्ध लढली. त्या ठिकाणाला त्यांच्या नावाने ओळख मिळू लागली जसे भावासिंग पुरा, जयसिंग पुरा, बेगम पुरा ( हे नाव औरंगजेबाच्या पत्नीच्या नावाने ओळखे गेले) औरंगपुरा, पद्मपुरा, कर्नपुरा, बायाजीपुरा, पहाडसिंग पुरा, फाजलपुरा असे जवळपास 52 पुरे म्हणजेच भाग जुन्या शहरात आहेत. औरंगजेबाच्या नावाने शहराचे नाव असल्याने नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी केली जात आहे. मग शहरात असलेल्या 52 पुऱ्यांचे नाव बदलणार का? असा प्रश्न पाईकराव यांनी उपस्थित केला आहे.
नाव बदलून काय साध्य होणार? -शहरांची नाव बदलून विकास होणार आहे का? असा प्रश्न अनेक वेळा उपस्थित करण्यात आला. नुकतेच आलाहबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले. मात्र शहराचे नाव बदलले तरी आलाहबाद विद्यापीठ, आलाहबाद कोर्ट, आलाहबाद संग्रहालय यांचे नाव बदलली का? औरंगाबाद 1990 च्या दशकात आशिया खंडात सर्वात झापाट्याने विकसित होणारे शहर अशी ओळख होती. तसेच औरंगाबादचे नाव बदलल्याने ती ओळख पुन्हा मिळणार आहे का? तर याचे उत्तर देता येणार नाही. शहरांची नाव बदलून फरक पडणार नाही तर त्यांचा विकास करून तो फरक पडणार आहे. त्यामुळे शहरांचे नाव बदल हा फक्त राजकारणापुरता प्रश्न आहे अस मत पाईकराव यांनी मांडले.
हेही वाचा -औरंगजेब कबर परिसर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद, पुरातत्व विभागाने घेतला निर्णय