औरंगाबाद :
शिवसेनेला गड राखण्याचे आव्हान
औरंगाबाद पश्चिम हा गड राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून, विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्यापुढे भाजप बंडखोर अपक्ष उमेदावर राजू शिंदे आणि एआयएमचे अरुण बोर्डे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला स्वत:चा गड राखण्याच आव्हान आहे. सरकारविरोधी भूमिकेचा फटका बसण्याची शक्यता
2009 मध्ये शिरसाट प्रथमच औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. दहा वर्षांपासून ते आमदार असून, यंदा निवडणुकीत विजयी झाल्यास त्यांची आमदारकीची हॅट्ट्रीक होणार आहे. मात्र शहरी, ग्रामीण, औद्योगिक वसाहत आणि तांडे अशा मिश्र लोकवस्तीच्या या विस्तिर्ण मतदारसंघाच्या समस्याही बहुविध आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज या मुलभूत समस्यांनी येथील नागरिक हैराण आहेत. शिरसाट यांच्यावर मतदारसंघातील नागरिकांची असलेली नाराजी आता उघड होत आहे. ही नाराजी या निवडणुकीत वेगळा पर्याय शोधणार का यावर शिरसाट यांचे भवितव्य अवलंबून राहाणार आहे.
भाजपची बंडखोरी
शिवसेना-भाजप युतीला राज्यात बंडखोरीचे मोठे ग्रहण लागले आहे. जवळपास 75 मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांच्या बंडखोरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यापैकीच एक आहे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ. भाजप नगरसेवक आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजू शिंदे यांनी येथून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा या मतदारसंघातील वावर वाढला होता. शिंदे यांनी शिरसाट यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपकडून मधुकर सावंत यांनी निवडणूक लढली होती. त्यांना 54,355 मते मिळाली होती; तर शिरसाट 61,282 मते मिळवून विजयी ठरले होते. मात्र, यावेळी भाजपकडून झालेली बंडखोरी शिरसाट यांना अडचणीची ठरू शकते असे जाणकारांचे मत आहे.
एमआयएम-वंचित फॅक्टर
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यावेळी वेगवेगळे लढत आहेत. एमआयएमकडून अरुण बोर्डे मैदानात आहेत; तर 'वंचित'ने राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात केलेले संदीप शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. सध्या एमआयएम उमेदवार अरुण बोर्डे यांच्या पत्नी महानगर पालिकेत विरोधीपक्ष नेतपदी आहेत. खासदार इम्तियाज जलील यांचे विश्वासू म्हणून बोर्डे यांची ओळख आहे. मतदारसंघातील दलित तरुणांमध्ये त्यांचा असलेला वावर ही त्यांची जमेची बाजू आहे. मागील विधानसभा निवडणुकीत येथून पँथर नेते गंगाधर गाडे यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. त्यांना 35, 348 मते मिळाली होती. या 35 हजार मतांमध्ये एमआयएम यावेळी किती वाढ करणार आणि दलित-मुस्लिमांची मते आपल्याकडे कशी खेचून आणणार यावरच त्यांच्या विजयाचे समीकरण ठरणार आहे.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद
चुकीचे शपथपत्र दिल्यामुळे काँग्रेस उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद झाला. यामुळे काँग्रेसचे 'पंजा' चिन्ह निवडणुकीत कुठेही दिसत नाही. 2014 मध्ये जितेंद्र देहाडे येथे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 15 हजार मते मिळाली होती. ही मते यावेळी एमआयएमकडे वळवण्यात खासदार जलील आणि उमेदवार बोर्डे यशस्वी होतात का हे पाहावे लागेल. यासोबतच दलितांची जवळपास 70 ते 72 हजार मते या मतदारसंघात आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या 62 ते 65 हजार असल्याने ही मते निर्णायक ठरणार आहेत.