महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात व्यापारी जनआंदोलनाच्या तयारीत - lockdown oppose

सकाळपासून नेमके कोणती दुकाने उघडी ठेवायची आणि कोणती नाही याबाबत गोंधळ निर्माण झाल्याने प्रशासनाने योग्यपद्धतीने सूचना कराव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

aurangabad lockdown
aurangabad lockdown

By

Published : Apr 6, 2021, 3:10 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात "ब्रेक द चेन"अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली. मात्र नवीन नियम म्हणजे लॉकडाऊनच असल्याचा आरोप केला जात आहे. सर्व व्यापार बंद होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर अचानक बंद कसा लावण्यात आला असा प्रश्न उपस्थित करत, नियम न बदलल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा औरंगाबाद व्यापारी संघटनांनी दिला आहे.

'नियमांमुळे निर्माण होत आहे संभ्रम'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार आणि रविवारी पूर्ण बंद आणि इतर दिवस कडक निर्बंध पाळण्याचे जाहीर केले. मात्र काढण्यात आलेल्या आदेशांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नेमके काय सुरू आणि काय बंद याबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. सकाळपासून नेमके कोणती दुकाने उघडी ठेवायची आणि कोणती नाही याबाबत गोंधळ निर्माण झाल्याने प्रशासनाने योग्यपद्धतीने सूचना कराव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.

'विक एंड बंद मान्य, मात्र पूर्ण नको'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन नियमावलीत विक एंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पूर्ण बंद पाळण्याचे निर्देश दिले. औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्चपासून हे नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे आधीपासूनच व्यापाऱ्यांनी या निर्णयाला सहमती देऊन त्याप्रमाणे बाजारपेठा बंद करायला सुरुवात केली होती. मात्र घोषणा एक आणि आदेश वेगळे हे कसे होऊ शकते, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. आठवड्यातील दोन दिवस बंद आम्ही पाळायला तयार आहोत मात्र पूर्ण बंद आता शक्य नाही. आधीच वर्षभर व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे. कसाबसा व्यवसाय पुन्हा सुरू झाला खरा, मात्र म्हणावा तसा व्यवसाय अद्याप सुरू होऊ शकला नाही. त्यात अचानक पूर्ण बंद तोही 25 दिवसांचा मान्य नाही. दोन दिवसांमध्ये यात बदल करा, अन्यथा व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, प्रफुल मालानी, अजय शहा यांनी दिला.

व्यापाऱ्यांनी घेतली खासदार कराड यांची भेट

औरंगाबाद व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेत, नव्याने लागलेल्या बंदबाबत मध्यस्ती करून मार्ग काढण्याची विनंती केली. सोमवारपर्यंत दुकान बंद करण्याबाबत कुठल्याही सूचना नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास नवे नियम जाहीर केले. नागरिक झोपेत असताना अचानक नवे निर्बंध जाहीर केले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नियमांमध्ये अनेक वेळा बदल केले. त्यामुळेच गोंधळ निर्माण होत असल्याचा आरोप औरंगाबादच्या व्यावसायिकांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details