औरंगाबाद -एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक वाळूज जवळील प्रती पंढरपूर येथे दरवर्षी येत असतात. मात्र, त्यावेळी पाकिटमारी मंगळसूत्र चोरी अशा घटना घडतात. त्यावर उपाय योजना करत पोलिसांनी वारकऱ्यांच्या वेशात गस्त घातली. त्यामध्ये गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या 35 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, रविवारी दिवसभरात गुन्हा घडल्याबाबत एकही तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी ( Aurangabad Police Arrested 35 Thief ) सांगितलं.
पोलीस झाले वारकरी - चोर पकडण्यासाठी पोलीस नवनव्या कल्पना राबवतात. तशी काहीशी कल्पना पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने राबवली. गर्दीचा फायदा घेत चोर सर्वसामान्यांचे पाकिट, मंगळसूत्र, चेन चोरी करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली. साध्या वेशात पोलीस असतात. मात्र, यावेळी वारकऱ्यांच्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले. 6 पोलीस अधिकारी आणि 60 कर्मचारी तैनात केले. दिवसभरात वारकऱ्यांच्या वेशात असलेल्या पोलिसांनी तब्बल 36 चोरांना पकडत नागरिकांच्या संपत्तीचे संरक्षण केले.