औरंगाबाद -शहरातील विमानतळावर कृत्रिम पाऊस पाडणारे विमान दाखल झाले आहे. मात्र विमान आले असले, तरी परिसरात आकाशामध्ये ढग मात्र दिसून येत नाहीत. यामुळे मराठवाड्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मराठवाड्यात सतत पडणारा दुष्काळ पाहता कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा करण्यात आली होती. जून - जुलै महिन्यात ढगाळ वातावरण होतं मात्र त्यावेळी यंत्रणा सज्ज नव्हती. आता मात्र ज्यावेळी यंत्रणा सज्ज झाली आहे, त्यावेळी पावसासाठी आवश्यक असलेले ढग उपलब्ध राहिले नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला कृत्रिम पावसासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
"विमान आले मात्र ढग गेले"...मराठवाड्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची दैना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होईल, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. कृत्रिम पावसासाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली. मात्र, पाऊस पाडण्यासाठी फवारणी करणारे विमान सौदीमध्येच होते. तेव्हा सोलापूर येथील विमानाने पाऊस पडण्याचा प्रयत्न केला गेला. तो प्रयोग अयशस्वी ठरला होता, यामुळे पूर्णवेळ विमान आल्यावर केलेल्या प्रयोगानंतर देखील कृत्रिम पाऊस पडेल का हा प्रश्न आहे.
जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व धरणे कोरडी पडली आहेत. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिकेही हातातून जाण्याची वेळ आली आहे. त्यात भरीस भर म्हणजे सरकारी अनास्था मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजली आहे. येथील लोकांच्या मते कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सरकारी दिरंगाई आडवी आली नसती तर थोडा दिलासा मिळाला असता, मात्र तसे झाले नाही. आता औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसासाठीची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे, मात्र या प्रयोगासाठी आवश्यक असलेले ढगंच गायब झाल्याने हा प्रयोग नक्की यशस्वी होणार का हाच मोठा प्रश्न आहे.