औरंगाबाद - कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक धोका होता तो वृद्धांना. मात्र या काळातही औरंगाबाद शहरातील मोतोश्री वृद्धाश्रमाचे योग्य नियोजन करून कोरोनाला आश्रमाच्या बाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. इतकेच नाही तर मृत्युदरदेखील कमी केला आहे.
आहारावर ठेवले नियंत्रण
आश्रमात राहणाऱ्या वृद्धांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता त्यांचा आहार योग्य ठेवण्याची गरज असते. त्यामुळेच मातोश्री वृद्धाश्रमात त्याबाबत खबरदारी घेण्यात आली. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण याची वेळ निश्चित करण्यात आली. जेवणात पौष्टिक अन्नाचा समावेश करण्यात आला. आश्रमात असलेल्या आजी आजोबांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे शक्य झाले. त्यामुळे कोरोनापासून बचावात करण्यात मदत झाली, अशी माहिती मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी दिली.
बाहेरील व्यक्तीस आश्रमात केली मनाई
वृद्धाश्रमात बाहेरच्या लोकांची ये-जा चालूच असते. त्यात देणगी देण्यासाठी, मदत करण्यासाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ असल्याने त्यापासून कोरोनाचा संसर्ग आश्रमात येण्याची भीती होती. त्यामुळे बाहेरील व्यक्तीस वृद्धाश्रमात येण्यास बंदी घालण्यात आली. कामानिमित्त आलेल्या व्यक्तीचा संपर्क वृद्धांशी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छतेचे सर्व उपाय राबवले गेल्याने कोरोनाला दूर ठेवण्यात मदत झाली, असे सागर पागोरे यांनी सांगितले.
मृत्युदरात झाली घट
वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या आहारासोबत औषधांची काळजी घ्यावी लागते. मागील दीड वर्षात योग्य उपचारपद्धती ठेवल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहिले. त्याचबरोबर वृद्धाश्रमातील मृत्युदर कमी झाला आहे. मागील वर्षी वृद्धापकाळाने प्रत्येक महिन्याला दोन ते तीन मृत्यू होत होते. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने घेतलेल्या काळजीमुळे मृत्युदरात घट झाली आहे. मागील सहा महिन्यात तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी दिली.
आश्रमातील वृद्धीचे पूर्ण झाले लसीकरण
मातोश्री वृद्धाश्रमात 112 वृद्ध वास्तव्यास आहेत. त्यात 50 पुरुष तर 62 महिलांचा समावेश आहे. कोरोनाला ठरवण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात आले. त्याचबरोबर लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर आश्रमातील वृद्धांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका काही प्रकरणात कमी करण्यात यश आले. त्याचबरोबर वृद्धाश्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण पूर्ण केले असून कोरोनाला ठरवण्यासाठी योग्य खबरदारी घेत आहोत, त्यामुळे आमच्या आश्रमातील आजी-आजोबा कोरोनाला ठरवण्यात यशस्वी झाल्याचा विश्वास मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी व्यक्त केला.