औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचे एक वर्ष पूर्ण झाले. मागील मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. औरंगाबादच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या मीना सिन्हा यांना सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव विलक्षण होता. मात्र त्या काळाने मला बरेच काही शिकवले अशी भावना प्रा. मीना सिन्हा यांनी व्यक्त केली.
पहिलाच रुग्ण असल्याने लोकांना वाटली भीती
मार्च 2020मध्ये भारतात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली, त्यात औरंगाबाद जिल्ह्यात प्रो. मीना सिन्हा यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्या वास्तव्य करत असलेल्या सिडको परिसरात वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि सर्वत्र अचानक नागरिकांना भीती वाटू लागली. त्यामुळे आजार झाल्यामुळे नाही तर आपल्यामुळे कोणाला बाधा तर झाली नाही ना? याची भीती प्रो. मीना सिन्हा यांना वाटू लागली. आजार नवीन असल्याने सर्वच वेगळे वाटत होते. सर्वत्र होणारी चर्चा यामुळे थोडी चिंता वाढली होती. आलेल्या अनुभवांमुळे जीवनाला वेगळे वळण मिळाले, अशी भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.
मृत्यूच्या अफवेने कुटुंब व्यथित
सिन्हा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची अफवा सुरू झाल्या. सोशल मीडियावर अफवा पासरवाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. प्रो मीना यांच्या कुटुंबीयांना हितचिंतक संपर्क करू लागले. त्यामुळे भीती निर्माण झाली. पसरलेल्या अफवेमुळे कुटुंबीय व्यथित झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाने अधिकृत माहिती जारी करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा खुलासा केला. मात्र काही तास कुटुंबीयांना यातना देणारा विलक्षण अनुभव त्यांनी सांगितला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वाटली चिंता
मीना कोरोनाबाधित झाल्यावर त्यांना स्वतःची नाही तर विद्यार्थ्यांनी चिंता वाटली. विदेशातून आल्यावर काही दिवस लेक्चर घेतल्याने अनेक विद्यार्थी आणि इतर शिक्षक संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना बाधा होऊ नये, अशी इच्छा त्यांची होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना संपर्कात आलेल्या विद्यार्थी आणि इतर प्राचार्यांनी तपासणी करण्यात आली. सुदैवाने कोणी बाधित झाले नाही. सिन्हा उपचार घेऊन रुग्णालयातून घरी आल्यावर अनेक दिवस नवीन रुग्ण आढळून आले नाही. आपल्यापासून कोणी बाधित नाही याचे समाधान होते. याकाळात विद्यार्थ्यांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी विचारपूस करत मानसिक आधार दिला. त्यामुळे त्याचा आनंद वाटत होता, अशी भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.
काही जवळच्यांनी फिरवली पाठ
कोरोनाबाधित झाल्यावर आलेले अनुभव विलक्षण आणि शिकवणारे होते. बाधित झाल्यावर काही निकटवर्तीयांनी पाठ फिरवली. मात्र काही लोक जी जास्त जवळची नव्हती, मात्र परिचित होती त्यांनी मनोधैर्य वाढवले. हिंमतीने परिस्थितीला तोंड देण्याचे बळ दिले. त्यामुळे कोण आपले आणि कोण नाही याची ओळख या आजाराने दिली. आजारपणातून बाहेर आल्यावर वर्ष फार वेगळे आणि बरेच काही शिकवणारे राहील, असा अनुभव त्यांनी सांगितला.
रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतो
एक वर्षांपूर्वी आजार नवा होता. उपचार करण्याची पद्धती म्हणावी तशी अवगत नव्हती. त्यामुळे मागील मार्च महिन्यात बाधित झालेल्या रुग्णाला भीती जास्त होती. आज उपचार उपलब्ध झाले आहेत. आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम झाली असल्याने रुग्णांना उपचार घेणे सोपे वाटत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.