औरंगाबाद : म्युकर मायकोसिसमुळे अनेकांना आपले अवयव गमवावे लागत आहेत. यात जबडा, नाक आणि डोळा हे अवयव निकामी होत असून शस्त्रक्रियेमुळे हे अवयव काढावे लागत आहेत. त्यामुळे अवयव काढल्यानंतर विद्रुपीकरण दूर व्हावे यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तयार होणाऱ्या कृत्रिम अवयवांची साथ मिळाल्याने रुग्णांना येणारे व्यंग दूर करता येणार आहे.
म्युकर मायकोसिसने तोंडातील अवयव गमावलेल्यांना कृत्रिम अवयवांद्वारे नवे आयुष्य! जबडा काढल्याने जेवण करण्यास अडचणीम्युकर मायकोसिस या आजारामुळे जबड्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाचं तोंड आणि नाक यांचा मार्ग एक होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी ग्रहण केलेले अन्न नाकाद्वारे बाहेर येते तसेच गुळणा करताना देखील नाकातून पाणी बाहेर पडते. त्यामुळे रुग्णांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपचार म्हणून औरंगाबादच्या घाटी येथील दंत विभागाने "ऑब्युरेटर प्लेट" तयार केली आहे. ही प्लेट बसवल्यास तोंड आणि नाक यांचा मार्ग पहिल्या सारखाच वेगवेगळा होतो तसेच जेवण केल्यास ते थेट पोटात जाते. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळतो अशी माहिती कृत्रिम दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ किशोर महाले यांनी दिली.
म्युकर मायकोसिसची तीव्रता वाढलीकोरोनावर उपचार घेऊन घेरी गेलेल्या रुग्णांना पहिल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये दात दुखणे, नाक दुखणे आणि डोळ्यांमध्ये वेदना होते. औरंगाबाद जिल्ह्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक रुग्ण गंभीर होत आहेत. या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात उपचारादरम्यान शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांना चेहऱ्यावरील अवयव गमवावे लागत असल्याने आजाराची गंभीरता समोर आली आहे.
कृत्रिम अवयवांमुळे मिळते नवे आयुष्यजबडा, डोळे आणि नाक हे चेहऱ्यावरील हे प्रमुख अवयव. मात्र म्युकर मायकोसिस या आजारामुळे हे अवयव गमावण्याची वेळ रुग्णांवर येते. त्यामुळे चेहऱ्यावर विद्रुपता दिसून येते. त्याच्या परिणामी रुग्णांच्या मानसिक मनोबलाचेही खच्चीकरण होते. अशावेळी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय दंत रुग्णालयाने तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे व्यंग दूर होऊन रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. आतापर्यंत 15 रुग्णांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले आहेत. तर पाच रुग्णांना कृत्रिम अवयव बसवण्यात येणार आहेत. कृत्रिम अवयव बसवण्याची ही प्रक्रिया जुनी असली तरी म्युकर मायकोसिस शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी हे अधिक उपयोगी पडत आहे. कृत्रिम टाळू, डोळे, नाक यामुळे रुग्णांचे मनोबल वाढून त्यांचे विद्रुपीकरण दूर होत आहे अशी माहिती दंतशास्त्र विभाग प्रमुख डॉ किशोर महाले यांनी दिली.