औरंगाबाद - येथील समर्थनगरमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 16 मार्च)रोजी दुपारच्या सुमारास घडली. व्यापाऱ्याला येथील त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण केली आहे. दरम्यान, साडेतेरा तोळ्यांच्या सोन साखळ्याही लुटल्या आहेत.
मैत्रिणीने सुपारी दिल्याचे तपासात समोर आले
या प्रकरणी रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दागिन्यांपोटी लुटमार करण्यासाठी त्यांच्यापैकी एकाच्या मैत्रिणीने सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. रोहित विठ्ठल बोर्डे, विवेक अनिल गंगावणे (१९ दोघेही रा. फुले नगर, गल्ली क्र. ३ उस्मानपुरा) आणि नदीम खान नजीर खान (रा. शम्स कॉलनी, शहानुरवाडी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. तर, रचना तुळशीराम निंभोरे (रा. सातारा परिसर) असे सुपारी देणाऱ्या महिलेचे नाव आहे.
५ लाख ४९ हजाराचे सोने लुटले
या प्रकरणात व्यापारी अशोक शंकर पाटील यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन मारहाण करून लुटले होते. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या दागिन्यांसाठी रचना निंभोरे हिने तीचा मित्र नदीम खॉन नजीर खॉन (रा. शम्सनगर, शहानुरवाडी) याच्या मार्फतीने सुपारी दिली होती.