औरंगाबाद- राज्याचे रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मुलाने शासकीय जमिनीवर घरकुल योजनेसाठी बेकायदा भूखंड लाटत तीस कोटींची फसवणूक केल्याचा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे यांनी केला आहे. शासनाची जमीन नोट्रीद्वारे घेता येत नाही, तरी देखील माजी नागराध्यक्ष सोमनाथ परदेशी त्यांची पत्नी ललिता परदेशी यांच्या मदतीने जमीन नावावर केल्याचा आरोप दि 6 जुलै रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
मंत्री संदीपान भुमरे यांच्या मुलाने तीस कोटींची जमीन हडपली?- दत्तात्रय गोर्डे असे आहे प्रकरण
रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी पैठण शहरातील महत्त्वाच्या जागी बेकायदा कब्जा केल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी हा आरोप केला आहे. पैठणच्या मुख्यजागी सहा हजार चौरस मीटर इतकी ही जागा असून या जागेची किंमत तीस कोटी रुपये इतकी झाली आहे. सिटी सर्वे क्रमांक 1026 ही जमीन नगर परिषद पैठण हद्दीमध्ये आहे. सदर जमीन हे महाराष्ट्र शासनाचे असून सदर जमिनीचे पीआर कार्डमध्ये महाराष्ट्र शासनाचे नाव मालकी रकानामध्ये नमूद केलेले आहे. तर इतर अधिकार रकानामध्ये महबूब शेख यांचे नाव दिसत आहे. आज सदरील जमीन ही मेहबूब शेख यांचे वारस हबीब शेख यांच्या ताब्यात आहे. त्यासंबंधी पीआर कार्डमध्ये देखील तशी नोंद आहे. असे असताना देखील जमीनीबाबत करारनामा करण्याचा अधिकार शेख हबीब यांना नव्हता व तो करून घेण्याचा अधिकार विलास भुमरे, सोमनाथ परदेशी, ललिता परदेशी यांना नव्हता. फक्त राजकीय दबावापोटी शासकीय जमीन हडप केल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला आहे. संदिपान भुमरे आणि त्यांच्या मुलाने ही जागा शासनाच्या मालकीची असताना देखील नोटरी करून 99 वर्षांच्या करारावर जमीन हस्तांतरित केली अशी तक्रार दत्ता गोर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे केली आहे.
'जमिनीचा अहवाल दाबला'
जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. इतकेच नाहीतर त्याबाबतचा पंचनामा देखील तयार करण्यात आला होता. मात्र राजकीय दबाव टाकून सामाजिक कार्यकर्त्यांना तक्रार मागे घेण्यास भाग पाडले, असा आरोप देखील दत्ता गोर्डे यांनी केला. इतकेच नाही तर शासकीय जागेबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या जातात अथवा भविष्यात जागेबाबत कुठलाही वाद उद्भवू नये, यासाठी राज्याचे मंत्री संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी अतिशय हुशारीने "सर्वांसाठी घरे 2022" या शासनाच्या धोरणाचा वापर करून घरकुल योजना सदरील जागेवर करणेबाबत प्रस्ताव तयार केला. सदरील योजनेसाठी शासन निर्णय 17 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयाचा लाभ घेऊन सदरील जागेची विल्हेवाट करण्याबाबत हालचाली सुरू करत असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
'जमिनीवर भुमरे यांच्या नातेवाईकांचे अतिक्रमण?'
पैठण नगर परिषद आणि भूमिअभिलेख यांनी पैठण शहरातील शासकीय जमिनीवर असलेल्या अतिक्रमण व त्यात राहत असलेल्या लोकांची यादी 17 जुलै 2020 रोजी तयार केली. सदरील यादी नुसार सिटी सर्वे नंबर 1026 मध्ये संजय जगन्नाथ शेळके, राम बाबासाहेब गटकळ, सतीश गोपीनाथ वाघ, गोपाल कायस्त, योगेश परदेशी, करण परदेशी यांच्या नावांचा उल्लेख दिसून येतो. या सर्व व्यक्ती राज्याचे मंत्री संदिपान भुमरे आणि माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांचे नातेवाईक असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला आहे. त्यामुळे सदरील जमीम अतिक्रमण प्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार देत असून गरज पडल्यास न्यायालयात धाव घेऊ अस दत्ता गोर्डे यांनी सांगितले.
हेही वाचा-मुंबईतील कुप्रसिद्ध हऱ्या-नाऱ्या अंडरवर्ल्ड टोळी, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, असा राहिला नारायण राणेंचा राजकीय प्रवास