औरंगाबाद -कोणताही महत्वाचा व्यक्ती आला की सुरक्षा यंत्रणा सज्ज केली जाते. यात पोलिसांसह श्वान पथक देखील तितकेच महत्वाचे. याच पथकातील आर्या या श्वानाचा गुरुवारी सकाळी गर्भपिशवीच्या आजारामुळे मृत्यू झाला. तिच्यावर सरकारी इतमामात अंत्यविधी करण्यात आले.
सरकारी इतमामात अंत्यसंस्कार -
सहा महिन्यांपासून आर्या गर्भाशयाच्या आजाराने त्रस्त होती. तिच्यावर शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवाय तिला सांधेदुखीचा त्रास होता. यातच गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता आर्याची प्राणज्योत मालवली. यानंतर आर्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सजविलेल्या वाहनातून तिची अंत्ययात्रा काढून छावणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी सहायक पोलीस आयुक्त विश्वंबर गोल्डे, पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांनी आर्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलाने सलामी देत बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडल्या. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांच्यासह बीडीडीएसचे अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित पोलिसांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
2012 मध्ये आर्या पोलीस दलात झाली दाखल -
12 वर्षीय श्वान आर्याने गर्भपिशवीच्या आजारामुळे बुधवारी अंतिम श्वास घेतला. 2012 साली आर्या पोलीस दलात दाखल झाली. पुण्यात 6 महिने प्रशिक्षण घेऊन औरंगाबाद बीडीडीएसमध्ये ती दाखल झाली. शहरातील विमानतळ, औरंगाबाद खंडपीठ, जिल्हा न्यायालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक, विभागीय आयुक्तालय आदी महत्त्वाच्या ठिकाणांची स्फोटक तपासणी आर्या आपल्या सहकाऱ्यासह करीत होती. यासोबत महाराष्ट्रातील विविध शहरांसह आणि गोवा राज्यात व्ही.व्ही.आय.पी. च्या दौऱ्यात सहभागी होऊन आर्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
हेही वाचा - कोरोनाच्या संकटातही श्वानांच्या मदतीला धावून जातेय 'ती'