औरंगाबाद- गेल्या वर्षभरापासून शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना आणि व्यवस्थेलाही आहे. त्याला पर्याय म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले खरे मात्र ते प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही. त्यात गरिबांना शिक्षण देण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये काही युवकांनी मात्र त्यात तोडगा काढला आहे. असाच प्रयत्न केला तो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या औरंगाबादच्या भगवान सदावर्ते यांनी.
गरीब वस्तीतील मुलांना मिळालं शिक्षण -
शेजारी वस्तीतील लहान मुले फिरत असल्याचे भगवान सदावर्तेच्या निदर्शनास आले. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण या मुलांना मिळत नसल्याने या मुलांसाठी, शिक्षणाची व्यवस्था करावी, याकरिता भगवान याने प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या भगवान सदावर्ते यांनी त्यांना शिकवण्याचा विडा उचलला. औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पुष्पनगर विभागामध्ये भगवान लिंबाच्या झाडाखाली 20 ते 25 विद्यार्थ्यांना दररोज शिकवू लागला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने झाडाखाली सुरू केली शाळा.. भगवान करतो वॉचमनचे काम -
बुलडाणा जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेला भगवान सदावर्ते औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी भगवान पुष्पनगरी विभागामध्ये वॉचमनचे काम करू लागला. तो राहत असलेल्या अपार्टमेंट शेजारी असणाऱ्या वस्तीतील गरीब मुलांना तो गेल्या महिन्यांपासून मोफत शिक्षण देत आहे. भगवान सदावर्ते या युवकाने घेतलेल्या पुढाकारामुळे मुलांना नवी उमेद मिळाली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आत्मविश्वास -
कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सोय केली मात्र गरीब विद्यार्थ्यांना मात्र परिस्थिती अभावी शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे. भगवान सदावर्ते या युवकाने घेतलेल्या पुढाकाराने गरीब मुलांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित सारखे विषय भगवान मुलांना शिकवत आहे. भगवानच्या शाळेत आता ऑनलाइन शिक्षण घेणारे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सदावर्ते सरांमुळे नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -...तर महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल - राजू शेट्टी