औरंगाबाद- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली. मार्च महिन्यात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस होणार असून 24 जानेवारीला या संमेलनाच्या तारखांची घोषणा ही केली जाणार आहे. याच बैठकीत संमेलन अध्यक्ष कोण असेल याबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबादला पार पडले होते. रानकवी ना.धों. महानोर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले होते. तर ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे होते.
दिल्लीसह नाशिक, सेलू येथून आली होती निमंत्रणे-
94 व्या साहित्य संमेलनासाठी नाशिक, सेलू, पुणे आणि अमळनेर येथून निमंत्रण आली होती. यामध्ये पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवत मे महिन्यात दिल्लीत संमेलन देण्याची मागणीही केली होती. साहित्य मंडळाने स्थळ निवडीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून 94 साहित्य संमेलनासाठी नाशिकची निवड केली. दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, संसर्ग होण्याचा धोका पाहता. दिल्ली निमंत्रणास तूर्तास स्थगित केल आहे, अशी माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
24 जानेवारी रोजी नाशिकला होईल बैठक-
मार्च महिन्यात 94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्यात येणार आहे. अवधी कमी असल्याने जानेवारी महिन्याच्या 24 तारखेला नाशिक मध्ये साहित्य संमेलनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात येतील. त्याचबरोबर संमेलनाचे अध्यक्षपद कोणाला द्यावे किंवा त्याबाबत काय निर्णय घ्यावा, याचा देखील विचार विनिमय या बैठकीत होणार आहे. साहित्य संमेलनाला अवधी कमी असल्याने तातडीच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. कोरोनाचा अनुषंगाने जे काही नियम शासनाने लावून दिले आहेत त्यांचे देखील पालन साहित्य संमेलनात करण्यात येईल. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून क्षमतेपेक्षा अर्ध्या संख्येने साहित्यिक आणि लेखकांना या संमेलनाला उपस्थित राहता येईल, अशी माहिती कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
हेही वाचा-राज्यपाल नियुक्त आमदार होऊ न देणारे घटनेचे मारेकरी- संजय राऊत