औरंगाबाद - शहरात सोमवारी आणखी ६१ रुग्णांचा काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६०० च्या पुढे गेली आहे. दोन दिवसांमध्ये एकूण आकडा ६१९ इतका झाला असून शहरात कोरोनाचे अनेक नवीन हॉटस्पॉट तयार होत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हेही वाचा...मुंबईत कोरोनाचे 875 नवीन रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 13 हजार 564वर
सोमवारी सकाळी राम नगर येथे २२, किले अर्क येथे ०८, सदानंद नगर सातारा येथे ०९, न्याय नगर येथे १, संजय नगर येथे १, एसआरपीएफ येथे १, एन-४ भागात १, कोतीवालपुरा भागात १, कैलास नगर येथे ५, जुना मोंढा भागात २ तर गंगापूर येथे ४ यांसह इतर भागात मिळुन ६१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकूणच शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आता अधिकच घट्ट होताना दिसत आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होत असून दौलताबाद, खुलताबाद, गंगापूर अशा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी गंगापूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर आज सोमवारी नव्याने चार रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरातील राम नगर, मुकुंदवाडी, कैलास नगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या सातत्याने वाढत असताना कोरोना बळींची संख्या देखील वाढत आहे. सोमवारी सकाळी एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 14 वर पोहचली आहे.