औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा मृत्युदर एक ते दीड टक्क्यांवर असला तरी प्रत्येक दहा दिवसांनी मृतांची संख्या आधीपेक्षा दुपटीने वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मार्च महिन्यात 435 जणांचा मृत्यू
गेल्या पाच महिन्यांपासून मंदावलेली कोरोना रूग्णसंख्येची गती फेब्रुवारीच्या मध्यानंतर अचानक वाढली. शंभरीखाली गेलेली बधितांची आकडेवारी रोजच हजारांच्या पार जाऊ लागली. त्यात मार्च महिन्यात तर बधितांचे उच्चांकी आकडे रोज समोर येऊ लागले. नव्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबर मृतांची संख्याही त्याच पटीने वाढली आहे. मार्च महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात 35,573 नवे रुग्ण आढळून आले असून 435 जणांचा मृत्यू झाला आहे.
मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी याची माहिती दिली आहे दर दहा दिवसांनी रुग्ण संख्या होत आहे दुप्पटमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी असलेली रुग्ण संख्या नंतर अचानक वाढली. 1 मार्च ते 10 मार्च याकाळात 4073 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 मार्च ते 20 मार्च याकाळात 11383 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, तर 97 जणांचा मृत्यू झाला आहे. 21 मार्च ते 31 मार्च याकाळात 20,017 नवे रुग्ण आढळून आले असून 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
लक्षणे असूनही उपचार न घेतल्याने मृत्यूकोरोनाचा सध्या पसरत असलेला संसर्ग झपाट्याने वाढणारा आहे. हा संसर्ग हवेतून पसरत असल्याने अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. लक्षणं असूनही कोरोना चाचणी न करता, आपल्याकडील असलेली औषध घेऊन घरीच उपचार करण्याकडे अनेकांचा कल आहे. आणि हीच बाब जीवघेणी ठरत आहे, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली. लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून उपचार घेतल्यास मृत्युचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र बरेच जण आजारपण अंगावर काढत असून प्रकृती बिघडल्यावर रुग्णालय धाव घेत आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरावर मोठा घात करत आहे. त्यामुळे लक्षणे जाणवली की तातडीचे उपाय, आणि शासनाने दिलेले निर्बंध पाळूनच आपण या आजारापासून बचाव करू शकतो असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.