औरंगाबाद- मसाज सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. शहरातील सिडको एन-४ भागातील युनियन बँकेच्या शेजारी असणाऱ्या एलोरा स्पा अँड वेलनेस बॉडी मसाज सेंटरवर पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी छापा टाकला. या ठिकाणी सुरू असलेल्या कुंटणखाण्यामधून चार महिलांची सुटका करण्यात आली. तर दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मसाज सेंटरच्या नावाखाली एलोरा स्पा अँड वेलनेसमध्ये आंबटशौकीन ग्राहकांना महिला पुरवल्या जात होत्या. या मसाज सेंटरचे राज्यासह परराज्यात जाळे असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची केली सुटका
सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, की एन-४ भागात असणाऱ्या मसाज सेंटर मध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार महिला पुरवल्या जातात. याची माहिती त्यांना वरिष्ठांना दिली. त्यावरून त्यांनी एका खबऱ्याला बोलावून मिळालेल्या माहितीची शहानिशा केली. मसाज सेंटरच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून वेळ घेण्यात आली. मसाजसाठी २ हजार रुपये भाव असल्याचे सांगण्यात आले. त्या व्यतिरिक्त सेवेसाठी मागणीनुसार किंमत मसाज सेंटरमध्ये घेत असल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. खबऱ्याकडे मसाजसाठी २ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर मसाज सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्यात बबलु बाळकृष्ण इंगळे (32 वर्षे रा, गणेश पार्वती आपार्टमेंट विजयनगर, नाशिक), आकाश राजु पगडे (23 वर्षे रा. मयुर पार्क औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले. तर चार महिलांची सुटका केली.
दत्तु माने, संदिप भालेराव, अमोल भालेराव हे स्पा सेंटरच्या नावाखाली परवाना घेऊन कुंटणखाना चालवत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक घनशाम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मिरा चव्हाण, विलास डोईफोडे, प्रविण मुळे, राजेश यदमळ, माया उगले, नंदा गरड या पोलिसांनी केली. सुटका करण्यात आलेल्या चारपैकी दोन महिला या परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.