अमरावती : शाळा सुरू होण्याचा दिवस उजाडला. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेने उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये केलेच नाही. यामुळे आता गळणाऱ्या छताखालीच जिल्ह्यातील अनेक शाळा भरणार आहेत. अमरावती शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भानखेडा बुजुर्ग येथील डिजिटल शाळेचीदेखील अशीच अवस्था आहे. गरीबांची मुले शिकत असणाऱ्या शाळेच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे काहीही लक्ष नाही, असेच दुर्दैवी चित्र सध्या तरी आहे.
अशी आहे शाळेची अवस्था : अमरावती शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भानखेडा बुजुर्ग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था अतिशय विदारक अशी आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. शाळेच्या खोल्यांवर पत्रे टाकलेले आहेत. त्या पत्र्यांना अनेक ठिकाणी छिद्रे पडलेली आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यात काही पत्रे उडून जाण्याची शक्यता आहे. शाळा सुरू असताना अशी घटना घडली तर ती मुलांच्या जीवावर बेतू शकते. टिन उडण्यासारखे प्रकार घडले, तर मोठा अपघात होण्याची शक्यतादेखील या ठिकाणी आहे. खिडक्यांची लावलेले पत्रेही गंजलेले आहेत. त्याला हात लागून विद्यार्थी जखमी होऊ शकतात.
शौचालयाची अवस्था खराबच : या शाळेच्या आवारात असणाऱ्या मुला-मुलींच्या स्वतंत्र शौचालयाची अवस्था अतिशय खराब आहे. शौचालयाचे लोखंडी पत्र्याचे दार अर्धवट तुटलेले आहे. मुलींसाठी असणाऱ्या शौचालयाला दारच नाही. एकूणच उन्हाळ्याच्या सुटीत जिल्हा प्रशासनाने शाळा दुरुस्तीसाठी कोणतेही काम केले नसल्याचे दिसत आहे. याची शिक्षा मात्र ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे.