अमरावती -अमरावती महापालिकेच्या मासिक आमसभेत आज युवास्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे शिरून गोंधळ घातला. या गोंधळामुळे आमसभा तहकूब करण्यात आली. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी युवास्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवला.
माहिती देताना युवास्वाभिमान पार्टीचे जिल्हध्यक्ष, महापौर आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -केंद्रीय ग्राम विकास पथक अमरावती जिल्ह्यात दाखल; अनेक गावांना दिल्या भेटी
..या मागणीसाठी झाला गोंधळ
अमरावती महापालिकेत कुशल आणि अकुशल कामगार पुरविण्याचा कंत्राट ईटकॉन या कंपनीला देण्यात आला आहे. दरम्यान या कंपनीकडून महापालिकेत काम टिकवून राहावे यासाठी कामगारांकडून 25 हजार रुपये लाच मागण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत, असे युवास्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांचे म्हणणे आहे. आमदार रवी राणा यांच्या निर्देशानुसार आम्ही या कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत आयुक्तांना अवगत करण्यासाठी आलो होतो. या कंपनीला कंत्राट देताना नगरसेवकांना आर्थिक लाभ झाला असल्याचा आरोपही जितू दुधाने यांनी केला. यामुळेच कार्यकर्त्यांनी सभागृहात जाऊन निषेध नोंदवला असे जितू दुधाने म्हणाले.
महापौरांनी केली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
महापालिकेच्या आमसभेत शिरून गदारोळ घालणे हे लोकशाहीला पोषक नसल्याने महापौर चेतन गावंडे हे या प्रकरणाची तक्रार घेऊन पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर कुसूम साहू, विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते. सभागृहात जो प्रकार घडला त्याबाबत तक्रार आम्ही पोलीस आयुक्तांडे केली आहे. पोलीस आयुक्तांनी कारवाई करणार, असे सांगितले असल्याचे महापौर चेतन गावंडे म्हणाले.
हेही वाचा -आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांच्या कारावासासह न्यायालयाने ठोठावला 45 हजारांचा दंड