अमरावती -राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर केली होती. असे असताना महापालिका आयुक्तांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हातोड्याने तोडून उचलला हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा असून, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल व्हावेत, अशी तक्रार आज युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिली आहे.
माहिती देताना युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते हेही वाचा -Amravati Yuva Swabhiman Agitation : 'बिल्डरांसाठी लगेच धावून येणाऱ्या महापौरांना शिवाजी महाराजांचा विसर का?'
अशी आहे तक्रार
आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीला राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. अतिशय सुरक्षित स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावर शहरातील लाखो शिवभक्त आनंदी झाले होते. शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असताना महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी 16 जानेवारीला पहाटे चार ते पाचच्या दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावरून हटविला. यावेळी एखाद्या निरुपयोगी वस्तूला उचलतात अशी अवहेलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची करण्यात आली. हा प्रकार छत्रपती शिवाजीमहाराजांचा अनादर करणारा असून महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह अतिक्रमण विभाग प्रमुख बनवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी तक्रारदारांना काढले ठाण्याच्या बाहेर
महापालिका आयुक्तांच्या विरोधात युवा स्वाभिमान संघटनेच्या ज्योती सैरिसे, अलका इंगोले, नीता तिवारी आणि कल्पना बनकर या चार महिलांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित तक्रार पोलीस उपायुक्त यांना दिल्यावर माध्यम प्रतिनिधींनी तक्रारदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर काढले यानंतरच त्यांना माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्याची परवानगी पोलिसांनी दिली.
हेही वाचा -दर्यापुरातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये यासाठी प्रहारचे वीरूगिरी आंदोलन