अमरावती - कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असतानाही परिसरातील लोकांनी अवहेलना करणे सुरुच ठेवली. अखेरीस सततच्या अवहेलनेतून आलेल्या नैराश्यामुळे एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत घडला आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवनात या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. सदर युवक जिल्हा मराठी पत्रकार भवन येथेच0 केअर टेकर म्हणून काम करत होता.
निखील पाटील (24) असे मृत युवकाचे नाव आहे. निखिल पाटील हा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे केअर टेकर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी शहरातील दसरा मैदान परिसरात राहणाऱ्या मित्रासह निखीलची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीच्या अहवालात निखीलच्या मित्राला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु, निखीलचा कोरोना चाचणी अहवाल मात्र निगेटीव्ह आला होता. असे असतानाही त्याच्या मित्राला कोरोना झाल्याने निखील धास्तावला होता. त्यातच तो राहत असलेल्या बेलपुरा परिसरातील शेजाऱ्यांनी देखील त्याला हिनवायला आणि त्याची अवहेलना करायला सुरुवात केल्याने निखील पाटील तणावाखाली होता.