मुंबई/अमरावतीअमरावतीमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. विरोधी पक्षनेत्यांचे आरोप अत्यंत बेजबाबदार आणि बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि जबाबदार नेते आहेत, असा माझा समज होता. मात्र त्यांनी तो खोटा ठरवला आहे, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिली आहे.
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, की अमरावती जिल्ह्यामध्ये १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमधील (Amravati Violence incident ) सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कारवाई करण्यात येत आहे. केवळ एका विशिष्ट समाजाला वेठीस धरणे किंवा गुन्हे दाखल करणे असा कोणताही प्रकार राज्य सरकार अथवा गृहमंत्रालयाकडून होत नाही.
हेही वाचा-धक्कादायक : रक्षकच झाला भक्षक; महाविद्यालयीन तरुणावर पोलीस कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक अत्याचार
काय होते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप?
अमरावतीतील हिंसाचारानंतर केवळ १३ तारखेला झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये दोषींवर सरकार कारवाई करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १२ तारखेला झालेल्या घटनांमधील दोषींवर राज्य सरकार कारवाई करत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यासंदर्भात यशोमती ठाकूर यांनी स्पष्टीकरण द्यावे असे त्यांनी आवाहन केले होते.