अमरावती -'तुझी झलक वेगळी श्रीवल्ली काळजात तू भरली” ( tuzi Zalak vegli srivalli ) अशा मराठी ‘श्रीवल्ली’कार यूट्यूबर्स विजय खंडारे या तरुणाला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेऱ्याची अनपेक्षित भेट ( Yashomati Thakur Gifted Camera To Youtuber ) मिळाली. या अनोख्या भेटवस्तूमुळे आपल्याला आनंद झाला असून, या शाब्बासकीने यापुढे अधिक चांगलं काम करून दाखविण्याचं बळ मिळाल्याची भावना विजयने व्यक्त केली आहे.
अनपेक्षित फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा दिला भेट -
तब्बल १५ दशलक्षहून अधिकवेळा युट्यूबवर पाहिले गेलेले “तुझी झलक वेगळी श्रीवल्ली काळजात तू भरली” हे गाणे अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील विजय खंडारे या तरुणाने बनविले आहे. बीएससीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेला विजय अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला. लहानपणी भाजी विक्रीपासून हमालीपर्यंतची कामे त्याने केली आहेत. मात्र टिक टॉक अँपपासून आपल्या सोशल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आणि अस्सल वऱ्हाडी बोली भाषेतील मनोरंजक व्हिडिओ व ब्लॉगद्वारे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. टिक टॉक बंद झाल्यानंतर विजय युट्यूबकडे वळला व अल्पावधीतच त्याला लोकप्रियता मिळत गेली. सुपरहिट ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या मराठी आवृत्तीने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचविले. याची दखल घेत ॲड. ठाकूर यांनी विजय खंडारेसह त्यांचे कुटुंबीय आणि टीमचा गौरव केला. यावेळी अनपेक्षित भेटवस्तु देण्याचे त्याला सांगितले होते. त्यानुसार अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना ॲड. ठाकूर यांनी विजयकडे प्रोफेशनल फोटो आणि व्हिडीओ कॅमेरा दिला.