महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

World Eye Donation Day Special : अमरावती जिल्ह्याला नेत्रदानाची नवी 'दिशा'; वर्षभरात 36 जणांनी केले नेत्रदान, 24 नेत्रांचे प्रत्यारोपण - नेत्रहीन मित्र गमावला त्या दुःखात मिळाली नवी दिशा

अमरावती जिल्ह्याला (IN Amaravati District) आता नेत्रदानाची नवी दिशा (New Direction of Eye Donation to Amravati) लाभली आहे. अमरावती शहरातील दिशा इंटरनॅशनल आय बँकेची (Direction International Eye Bank) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्रदान चळवळीत महत्त्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे या वर्षी अमरावती जिल्ह्यात दिशा ग्रुपच्या पुढाकाराने एकूण छत्तीस लोकांनी नेत्रदान केले (Thirty-Six People Donated Eyes) असून, यापैकी चोवीस लोकांवर नेत्र प्रत्यारोपण करण्यात आले आहे. (Eye Transplants on 24 People)

Disha International Eye Bank Amravati
दिशा इंटरनॅशनल आय बँक

By

Published : Jun 10, 2022, 5:00 PM IST

अमरावती : रक्तदान चळवळीत आघाडीवर असणाऱ्या अमरावती जिल्ह्याला आता नेत्रदानाची नवी दिशा लाभली आहे. अमरावती शहरातील दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या (Disha International Eye Bank) वतीने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्रदान चळवळीत महत्त्वाची भूमिका राबविली जात आहे. विशेष म्हणजे या वर्षी अमरावती जिल्ह्यात दिशा ग्रुपच्या पुढाकाराने एकूण छत्तीस लोकांनी नेत्रदान केले (Thirty-Six People Donated Eyes) असून, यापैकी चोवीस लोकांवर नेत्र प्रत्यारोपण (Eye Transplants on 24 People) करण्यात आले आहे.

दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती

नेत्रहीन मित्र गमावला त्या दुःखात मिळाली नवी "दिशा" : अमरावती शहरातील दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे संचालक स्वप्निल गावंडे हे इयत्ता सातवीत असताना त्यांच्या अब्दुल नावाच्या नेत्रहीन मित्रासाठी दृष्टी प्राप्त होऊ शकते, अशी माहिती कोणीतरी स्वप्निलला सांगितली. आपल्या मित्राला ही सृष्टी दिसावी यासाठी स्वप्निल गावंडे यांची धावपळ सुरू झाली. स्वतःच्या शाळेतच त्यांनी नेत्रदानबद्दल जनजागृती सुरू केली. याच काळात एका व्यक्तीच्या अपघाती निधनानंतर त्याचे नेत्र अब्दुलला मिळणार याचा आनंद स्वप्निल गावंडे यांना होता. मात्र, अमरावतीत नेत्रपेढी उपलब्ध नसल्याने मित्रासाठी मिळालेले डोळे शाबूत राखता आले नाही याची खंत स्वप्निलला खटकायला लागली.

वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी संस्था स्थापन केली : अब्दुलसाठी दुसऱ्या डोळ्यांची व्यवस्था होण्यापूर्वीच अवघ्या वर्षभरात त्याचे निधन झाले. मित्राला डोळे मिळू शकले नाही याची सल मनात घेऊन दहावीनंतर अवघ्या अठरा वर्ष वयात असताना स्वप्निल गावंडे यांनी 2009 मध्ये दिशा एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे सोबतच नेत्रदानाबद्दल प्रचार-प्रसाराचे कार्यक्रम शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविले. बारावीनंतर व्हीएनआयटी वेल्लोर या ख्यातनाम अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळालेला प्रवेश केवळ आपल्या संस्थेसाठी नाकारून अमरावती शहरातील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यावर निलेश गावंडे यांनी आपली दिशा संस्था कायमस्वरूपी नेत्रदानाच्या कार्यात झोकून दिली. आज नेत्रदान चळवळीत विदर्भातील सर्वात महत्त्वाची संस्था म्हणून दिशा संस्था ओळखली जाते विशेष म्हणजे गेल्याच वर्षी या संस्थेचे नामकरण दिशा इंटरनॅशनल आय बँक असे करण्यात आले.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विस्तारले काम :आज अमरावतीसह यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये दिशा ग्रुपच्या वतीने नेत्रपेढीची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे नेत्रदान करणारे तसेच ज्यांना नेत्राची गरज आहे, अशा सर्वांची यादी दिशा इंटरनॅशनल बँक शासनाला तयार करण्यास विनंती केली. शासनाने या संदर्भात पोर्टल निर्माण केल्यामुळे राज्यातील नेत्रांची प्रतीक्षा यादी आमच्या समोर आली. विशेष म्हणजे यामुळे नेत्रदानाच्या महत्त्वाच्या कार्यात पारदर्शकता आली, असे स्वप्निल गावंडे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.

परवानगी असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातूनच व्हावे नेत्रदान :कोणताही नेत्रतज्ञ हा नेत्रदान करून घेऊ शकतो असा गैरसमज समाजात आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत ज्या संस्थांची नोंदणी झाली आहे त्याच संस्था नेत्र काढण्याचे आणि नेत्रांचे प्रत्यारोपण करू शकतात. यामुळे ज्यांना नेत्रदान करायचे आहे त्यांनी अधिकृत नेत्रपेढीशी संपर्क साधावा. अमरावतीसह अनेक ठिकाणी काही संस्था किंवा व्यक्ती ज्यांना नेत्रदानाचा संदर्भात कुठलीही शासनाकडून परवानगी नाही अशा संस्था आणि व्यक्तींवर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांच्याकडे जाऊच नये असा सल्ला स्वप्निल गावंडे यांनी दिला आहे.

नेत्रदान आणि प्रत्यारोपणाची अशी आहे तांत्रिक प्रक्रिया :अनेक व्यक्तींना मरणोत्तर आपले डोळे दान करावयाचे असतात. यामुळेच दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या वतीने नेत्रदानबाबत योग्य जनजागृती उपक्रम राबवून नेत्रदान करण्याची इच्छा असणाऱ्या मृत व्यक्तीचे तातडीने किंवा जास्तीत जास्त चार ते सहा तासांत केवळ बुबुळ काढले जातात. तत्पूर्वी मृत्यू होताच मृत व्यक्तीचे डोळे तत्काळ बंद केले जातात. तसेच, त्यांच्या डोक्याखाली दोन उशा ठेवल्या जातात. मृत व्यक्तीचे बुबुळ काढल्यावर त्यांना तत्काळ फ्रिजमध्ये जतन करून ठेवले जाते. नेत्रदान करणाऱ्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेतली जाते. त्यानंतर त्यांचे सूक्ष्म दुर्बिणीद्वारे निरीक्षण केले जाते. तसेच, नेत्रहीन व्यक्तीला हे बुबुळ उपयोगी पडतील की नाही याची चाचणी दिव्याच्या प्रकाशातसुद्धा केली जाते. त्यानंतर नेत्रप्रत्यारोपण केंद्राशी संपर्क साधून ज्या व्यक्तींना बुबुळाची गरज आहे, अशा व्यक्तींना हे बुबुळ तत्काळ पुरविण्याची व्यवस्था केली जाते. या तांत्रिक प्रक्रिया संदर्भाची माहिती दिशा इंटरनॅशनल बँक येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे हिमांशू बंड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.




हेही वाचा : नेत्रदान दिन विशेष, अवयवदानासाठी सरकारने कायदा करावा - डॉ. ऋषिकेश नायगावकर

ABOUT THE AUTHOR

...view details