अमरावती -हनुमान चालीसा पठण आवरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी 15 एप्रिल पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत टीकेची झोड उठवली आणि हा विषय थेट राणा दांपत्याला बारा दिवसाच्या कारावासात घेऊन गेला. 5 मेपर्यंत राणा समर्थक ( Ravi Rana ) आणि शिवसैनिकांनीमधला राडा ( Rana Vs Shivsena ) अमरावतीकर सतत पाहत असताना काही दिवसांपूर्वी लद्दाखमध्ये राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या ( Sanjay Raut And Navneet Rana Meeting In Ladakh ) भेटीचे फोटो व्हायरल झालेत आणि नेत्यांमधील हा वाद संपुष्टात आला, असा संदेश पसरविण्यात आला. . नेत्यांची हसत-खेळत भेट झाली असली तरी वास्तवात मात्र अमरावतीत राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये काही सेट नसल्याचेच वास्तव आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने राणा समर्थक आणि शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता दोन्ही बाजूंनी दोन टोकांच्या भूमिका समोर आल्या.
राणा समर्थक म्हणतात आमचे मतभेद, मनभेद नाही -लद्दाख येथील परिस्थिती चा दौरा करण्यासाठी केंद्रीय समिती मध्ये खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सोबत होते. या दौर्यात आमदार रवी राणा हे सुद्धा सहभागी झाले होते. लडाखमध्ये महाराष्ट्राचा विषय भेटणे हे योग्य नाही आणि महाराष्ट्राची अशी संस्कृतीही नाही. यामुळेच हनुमान चालीसावरून महाराष्ट्रात जो काही गोंधळ उडाला, तो विषय लद्दाखमध्ये काढणे महाराष्ट्रासाठी शोभणारे नव्हते. यामुळेच खासदार नवनीत राणा आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राची परंपरा जोपासत लद्दाखमध्ये लद्दाखात यांच्याच प्रश्नांकडे लक्ष दिले. बाकी महाराष्ट्रात शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेचा आम्ही ठामपणे विरोध करत राहू. महाविकास आघाडी सरकारमधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, त्याचे स्वागतही करू, अशी प्रतिक्रिया आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने आणि युवा स्वाभिमान पार्टी कोर कमिटी सदस्य बाळासाहेब इंगोले यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना दिली.
शिवसैनिक म्हणतात राणांची लद्दाखमध्येही नौटंकी -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे किती नौटंकीबाज आहेत, हे नव्याने सांगायची गरज नाही. खासदार संजय राऊत यांनी राणा दांपत्याची कुठल्याही प्रकारची सलगी केलेली नाही. लद्दाखमध्ये केंद्रीय समितीच्या दौर्यात असताना ज्या ठिकाणी खासदार संजय राऊत आहेत, तेथेच उभे राहून राणा दाम्पत्याने फोटोसेशन करून घेतले. आणि हे फोटो मुद्दाम माध्यमांच्याद्वारे पसरविले. गेल्या महिनाभरात राणा दाम्पत्याने जो काही गोंधळ घातला. तो शिवसैनिक कधीही विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा टेंभरे आणि शिवसैनिक संजय गव्हाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.