अमरावती -जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. सात किलोमीटर अंतरावर असणारा अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे ( Seven gates opened of Upper Wardha Dam ) एकूण तेरापैकी सात दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणा काठच्या गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मेळघाटमधील सिपना तापी या मोठ्या नद्यांना पूर आल्यामुळे धारणी तालुक्यातील एकूण 27 गावांचा संपर्क तुटला आहे. धारणीसह चिखलदरा तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सिपना नदीला आलेल्या पुरामुळे बिया गावालगत वाहणाऱ्या नदीच्या पुलावरून पाच फूट पाणी वाहून गेले, यामुळे जवळपास वीस गावांचा संपर्क धारणी शहरापासून तुटला होता.
'या' गावांना पुराचा फटका :उकूपाटी,निरगुडी, एकदारा, काटकुंभ, चटावाबोर्ड, चोथर, भोंडीलावा, वैरागड कुटांगा, रंगूबेली कोपमार खामदा कोंबडाडाणा या गावांना पुराचा फटका बसला आहे. अमरावती चिखलदरा मार्गावरील व्याघ्र प्रकल्पाच्या संकुलानजीक नदीवरील पुलावरून पूर वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला देखील फटका बसला आहे.