अमरावती -मंगळवारी पहाटे अमरावती शहर आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे अमरावतीकरांची तारांबळ उडाली आहे. शहरातील राजापेठ राजकमल, दस्तूर नगर, यशोदा नगर, रुक्मिणी नगर, गाडगे नगर, शेगावनाका आदी परिसरात पाणी तुंबले आहे. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात येणाऱ्या बालाजी नगर येथे अनेक घरे पाण्याखाली गेल्यामुळे या भागात हाहाकार उडाला आहे.
बडनेरा नवी बस्ती परिसरात अनेक घर पाण्यात -
ढगांच्या कडकडाटासह पहाटे तीन वाजतापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. पावसाला सुरुवात होताच काही वेळातच बडनेरा नवी वस्ती परिसरात येणाऱ्या बालाजी नगर या परिसरातील अनेक घर अर्ध्यापर्यंत पाण्याखाली बुडाली. या परिसरालगत असणाऱ्या नाल्यातील पाणी थेट नागरी वसाहतीत शिरल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. या परिसरात कंबरभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. या भागातील अनेकांची वाहने पाण्यात बुडाली अनेकांच्या घरात विंचू, साप शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बचाव पथकासह महापौरांनी घेतली परिसरात धाव -
बडनेरा जुनी वस्ती परिसरात येणाऱ्या बालाजी नगर येथील गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच महापौर चेतन गावंडे भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे बचाव पथक बालाजी नगर परिसरात धडकले. पहाटे साडेतीन वाजल्यापासून या परिसरातील पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्याची सफाई केली नसल्यामुळे या नाल्याचे पाणी परिसरात शिरले. तसेच या भागात रस्त्यांचे बांधकाम झाले नाहीत आणि हव्या त्या सुविधा या भागात उपलब्ध नसल्यामुळे हा संपूर्ण परिसर पाण्याखाली तुंबून गेला असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.
राजापेठ अंडरपासमध्ये साचले पाणी -
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राजापेठ अंडरपासमध्ये पाणी साचले आहे. यामुळे राजापेठ ते दस्तूर नगर हा मार्ग बंद झाला आहे. अंडरपासमध्ये साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्यामुळे अतिशय गर्दीचा आणि महत्त्वाचा हा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे.