अमरावती -अमरावती शहरातील वडाळी तलाव मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. वडाळी तलावातील पाणी सुरक्षा भिंतीवरून कोसळून वाहत असल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अंबा नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे तलाव परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
1889मध्ये तलावाचे बांधकाम -
शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागातील टेकड्यांवरून खाली वेगाने येणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी 1889मध्ये इंग्रज शासकांनी वडाळी तलाव बांधला. या तलावाला सहाय्यभूत बनवून फुटका तलाव आणि भवानी तलावाची निर्मिती 1899मध्ये करण्यात आली. पूर्वी शहरातील कॅम्प परिसरात वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी तलावाच्या पायथ्याशी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली होती. टेकड्यांवरून वाहत येणारे पाणी आधी भवानी तलावात आणि भवानी तलावाची पातळी ओलांडल्यावर पाच किलोमीटर अंतरावरील फुटक्या तलावात यायचे फुटका तलाव तुडुंब भरल्यावर त्यात पाणी वडाळी तलावात पोचते, अशी व्यवस्था आहे. वडाळी तलावाचे पाणलोट क्षेत्र दोन चौरस मैल असून तलावाची क्षमता दोन दशलक्ष घनमीटर एवढी आहे. तलावाने 21 हेक्टर जागा व्यापली आहे. त्यापैकी निव्वळ तलावाखालील जमीन वीज पॉईंट 99 हेक्टर आहे. तलावाच्या मध्यभागाची खोली 18 मीटर इतकी आहे.
जलकुंभीमुळे तलाव झाला खराब -
अमरावती महापालिकेच्या मालकीचा असणाऱ्या वडाळी तलावात चिला या वनस्पतीसह कमळाची झाडे उगवली आहेत. यांनी संपूर्ण तलाव व्यापला असून या तलावाची गत अनेक वर्षांपासून सफाई केली नसल्यामुळे हा तलाव खराब झाला आहे. 2012मध्ये तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर अंबा नाल्याला पूर येऊन नाल्याच्या काठी असणाऱ्या अनेक भागात पाणी शिरले होते. 2013 ते 2018पर्यंतच्या पाच वर्षाच्या कालावधीत हा तलाव भरलाच नव्हता. 2019 आणि 2020मध्ये तलावाने पुन्हा पातळी गाठली असताना या वर्षी बऱ्याच उशिराने वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.