अमरावती : अमरावती शहरातील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी श्याम चौकलगत घंटी घटा परिसरात रात्री साडेदहा वाजता निर्घृण हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट त्यांनी शेअर केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील राजकमल चौक येथे उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली ( Tribute to Umesh Kolhe ) वाहिली जात आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ( Tight security in the city now ) लावण्यात आला आहे.
भाजपच्या वतीने श्रद्धांजली सभा व भजन : राजकमल चौक येथे भाजपच्या वतीने उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले आहे. उमेश कोल्हे यांच्या फोटोसमोर पुष्पहार वाहून भाजप कार्यकर्ते भजन करीत आहेत. राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अनिल बोंडे ( MP Dr. Anil Bonde ) यांच्यासह जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, तुषार भारतीय यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्रित आले आहेत. तसेच यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितले की, अमरावतीत औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच घेतील. या हत्ते मागील कटकारस्थान लवकरच उघड होईल आणि हे कटकारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा ठोठावल्या जाईल.
राजकमल चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप : उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्या वतीने राजकमल चौक येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला असताना राजकमल चौक परिसराला पोलीस ठाण्याचे स्वरूप आले आहे. राजकमल चौकासह शहरातील जयस्तंभ राजापेठ इमिन चौक गांधी चौक या परिसरातील व्यापारी प्रतिष्ठान आज बंद आहेत. अमरावती पोलिसांसह मुंबई पोलीस अकोला पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीसुद्धा राजकमल चौक येथे तैनात करण्यात आली आहे. दंगा नियंत्रण पथक जलद कृती दलसुद्धा राजकमल चौक येथे तैनात असून, राजकमल चौकालगत असणाऱ्या सर्व संवेदनशील परिसराला बॅरिकेड्स लावण्यात आले आहे.