अमरावती- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेचे धडे ऑनलाईनच गिरवले जात होते. मात्र, आता राज्यशासनाने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जी गावे कोरोनामुक्त आहेत. किंवा ज्या गावात एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, अशा गावात आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून शाळा सुरू होत आहेत. त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांतल्या शाळांमध्ये आज घंटा वाजणार आहे.
अमरावती शहर आणि जिल्ह्यामध्ये अमरावती महानगरपालिका क्षेत्र, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात शाळा बंदच राहणार आहेत. तर ग्रामीण भागातील 748 शाळा पैकी 337 शाळा कोरोना नियम पाळून आजपासून सुरू होणार आहेत. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मार्गदर्शक सूचना, शासन निकष व ग्रामपंचायत स्तरीय समितीच्या देखरेखीखाली ठराव घेऊन ग्रामीण भागांत शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.