अमरावती -नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट ठेवल्यामुळे अमरावतीमधील औषध विक्रेते अमोल कोल्हे यांची निर्घृण हत्या ( Amol Kolhe Murder Case ) करण्यात आली होती. या प्रकरणी सात शेख इरफान शेख रहीम या मास्टर माईंडसह सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. मात्र, आता त्यानंतर अमरावती शहरातील ज्या व्यक्तींनी ही पोस्ट ठेवली होती त्यांनाही धमक्या येऊ लागल्या आहेत. अशीच एक धमकी देणारी ऑडिओ क्लिप उघड झाली आहे. या ऑडिओ क्लिपची इटीव्ही भारत पुष्टी करत नाही.
धमकी देणारा शेख इरफान शेख रहीमच्या संघटनेचा कार्यकर्ता -शहरातील डॉक्टर गोपाल राठी यांना राजीक मिर्झा नावाच्या व्यक्तीने मोबाईल फोनवर कॉल करून तुम्ही नुपूर शर्माच्या समर्थनात व्हॉट्सअप स्टेटस का ठेवले असा प्रश्न विचारून त्यांना तुमच्या विरोधात आम्ही सगळे एकत्रित येऊ हे योग्य नाही. नुपूर शर्माचे समर्थन तुम्हाला का करावेसे वाटले याचा खुलासा करा आणि व्हॉट्सअपवरच आमची जाहीर माफी मागा अन्यथा परिणाम योग्य होतील अशा स्वरुपाची धमकी दिली आहे. याच व्यक्तीने शहरातील जय मोबाईलच्या संचालकांना देखील अशा स्वरूपाचा कॉल करून धमकावले आहे. धमकी देणारा अमोल कोल्हे हत्या प्रकरणातील मास्टर माईंड शेख इरफान शेख रहीमच्या संघटनेचा कार्यकर्ता आहे.
मोबाईलवरून दिलेल्या धमकीत काय -राजीक मिर्झा नावाच्या व्यक्तीने डॉक्टर गोपल राठी यांना मोबाईलवरून धमकी दिली आहे. धमकीमध्ये तो उर्मटपणे डॉ. गोपाल राठी यांच्याशी बोलत असल्याचे दिसते. नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट का ठेवली असा प्रश्न त्याने राठी यांना थेट केला. त्यावर राठी हे त्यामागे आपला काहीही उद्देश नव्हता, इतरांनी ठेवले म्हणून आपणही व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले असे सांगतात. मात्र, त्यावर राजीक मिर्झा म्हणतो की, नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मियांच्या विरोधात वक्तव्य केले आणि त्यांच्या समर्थनार्थ असे स्टेटस ठेवले आहे. म्हणजेच तुम्ही मुस्लिम धर्माच्या विरोधात कृत्य करीत आहात. त्यावर डॉ. गोपाल राठी हे आपला तसा काहीही उद्देश नव्हता, मी ते स्टेटस काढून घेतो, असे सांगतात. मात्र तरीही मिर्झा याचे समाधान होत नाही. त्यावर तो माफी मागी नाहीतर आम्ही सर्व तुमच्या विरोधात एक होऊ अशी धमकी देतो. या ऑडिओ क्लिपची इटीव्ही भारत पुष्टी करीत नाही.