अमरावती -महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये अचलपूर मतदार संघात प्रहार पक्षाचे संस्थापक असणारे आमदार बच्चू कडू सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणारे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. ( Cabinet Expansion Of Shinde Government ) बच्चू कडू यांच्यासोबतच त्यांच्या प्रहार पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे देखील होते. सलग चारवेळा अचलपूर विधानसभा मतदार संघाचे बच्चू कडू प्रतिनिधित्व करत असून आपल्या आगळ्या-वेगळ्या रांगड्या शैलीने बच्चू कडू हे संपूर्ण राज्यात ओळखले जातात. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळात बच्चू कडू यांनाही मंत्रीपद मिळेल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.
उद्धव ठाकरें विरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या रवी राणांच्या नावाची चर्चा -उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करणारे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना हमखास मंत्रीपद मिळणार असल्याचे त्यांच्या युवा स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. विशेष म्हणजे आमदार रवी राणा यांनी पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यासह हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या आंदोलनामुळे राणा दाम्पत्याने संपूर्ण देशाचे लक्ष स्वतःकडे वेधले होते. राणा दांपत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.