अमरावती- आयएएस व आयपीएस होऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचा नोकर होऊ नये, अशी वडिलांची अपेक्षा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे वंचितांना न्याय मिळावा यासाठी मी न्यायाधीश व्हावे असा वडिलांनी दिला होता. अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून विराजमान झाले भूषण गवई यांनी सत्कार सोहळ्यात सांगितली. शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंबानगरीच्या मातीत जन्मलेले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून विराजमान झालेले भूषण गवई यांचा शहरात बुधवारी सत्कार करण्यात आला. त्यांचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पद अमरावतीसाठी भूषण ठरले असल्याचा सूर सोहळ्यात उमटला. सभागृहात अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अॅड. महेंद्र तायडे यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार केला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईंचा सत्कार
सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, फ्रेजरपुरासारख्या भागात आम्ही राहायचो. फ्रेजरपुरा कसा आहे हे आजही सर्व अमरावतीकर ओळखून आहेत. नगरपालिकेच्या शाळेत शिकणारा जेमतेम विद्यार्थी होतो. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश वगैरे होईल अशी कल्पनाही कधी मनात आली नाही. वडील दादासाहेब यांच्यासोबत फिरणे व आंदोलनात सहभागी होणे यातून समाजभान आले. कमी वयात उच्च न्यायालयाचा मी न्यायाधीश झालो. आज सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो. पैशाला महत्व दिले नाही. पण पैसा भरपूर आला. नव्या वकिलांनी पैशाच्या मागे न लागता प्रामाणिक मेहनत करावी. पैसा मग आपोआप येतो, असा त्यांनी वकिलांना सल्ला दिला. अमरावतीत सत्कार होतो आहे, हे माझे भूषण आहे, असे त्यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. प्राजक्ता मशीदकर आणि अॅड. उर्वी केचे यांनी केले.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, न्यायमूर्ती झेड.ए.हक, न्यायमूर्ती व्ही. जी जोशी, न्यायमूर्ती श्रीमती पी.व्ही.गानेडीवला प्रामुख्याने उपस्थित होत्या. खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार बी.टी. देशमुख, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, भाऊ डॉ. राजेंद्र गवई, मुलगी करिष्मा, माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह अमरावतीत जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, वकील आणि शेकडो अमरावतीकर कार्यक्रमाला उपस्थित होते.