अमरावती -सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 6 हजार 144 पदांसाठी 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शनिवारी होणाऱ्या आरोग्या विभागाच्या गट 'क' आणि 'ड' परीक्षेसाठी जिल्ह्यासह विविध भागातून 14 हजारापेक्षा अधिक विद्यार्थी अमरावतीत दाखल झाले होते. ही परीक्षा 14 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्थान सहन करावा लागला.
असा झाला घोळ -
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'क'आणि 'ड'अशा दोन्ही गटांसाठी अनेक युवकांनी अर्ज केले होते. मात्र, या दोन्ही गटातील परीक्षा एकाच वेळेस होत असल्याने विद्यार्थ्यांना दोन पैकी कुठल्याही एकाच गटाचा पेपर द्यावा लागणार होता. अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नव्हते. तर अनेकांच्या हॉल तिकीटवर फोटो, केंद्र आणि परीक्षेची वेळच नमूद नव्हता. नेमक्या कुठल्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असेल याची माहितीही परीक्षार्थींना नव्हाती, त्यामुळे राज्य सरकारच्या गोंधळावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
चीन आणि उत्तर प्रदेशातही परीक्षा केंद्र -
आज होणाऱ्या परीक्षेसाठी अनेक परीक्षार्थींना चक्क चीन आणि उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र मिळाले होते. हा संपूर्ण प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करणारा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अमरावती जिल्ह्यात बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थीही परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय रात्री दहा वाजता जाहीर झाला असला, तरी अनेक विद्यार्थी या वेळेस प्रवासात असल्यामुळे त्यांना आपली परीक्षा रद्द झाल्याची माहिती परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावरच मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी सकाळी होणाऱ्या परीक्षेसाठी संपूर्ण रात्र ही बस स्थानकावरच काढली. असे असताना शासन आणि न्यासा कंपनीच्या घोळामुळे परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षा रद्द झाल्याबाबत काही विद्यार्थ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शासनाचा निषेधही नोंदवला.
हेही वाचा -आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट, 'एमपीएससी'मार्फत परीक्षा घेण्याची मागणी