अमरावती- हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना बुधवारी रात्री नागपूर येथून अटक केली आहे. सध्या या प्रकरणाच्या चैकशीबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.
कारवाईसाठी मंत्रालयातून घेतली परवानगी
रेड्डीला ताब्यात घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी मंत्रालयातून रितसर परवानगी घेऊनच कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. रेड्डीला नागपुरातून ताब्यात घेऊन रात्रीच अमरावतीला आणले आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी पोलिसांच्या ताब्यात अपर पोलीस महासंचालक करीत आहे तपास
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे चौकशी करीत आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यात असणाऱ्या प्रज्ञा सरवदे यांनी हरिसालला भेट दिल्यावर बुधवारी तीन तास पोलीस अधिक्षक कार्यालयात ठाण मांडून या प्रकरणाची चौकशी केली गेली. गुरुवारी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे या श्रीनिवास रेड्डी याची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे, या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार कारागृहात असून, दीपाली यांनी शिवकुमार आणि रेड्डी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.
काय आहे प्रकरण?
मेळघाटातील हरिसालच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वनाधिकारी विनोद शिवकुमार याच्या त्रासाला कंटाळून 25 मार्चला आत्महत्या केली होती. या प्रकरणात तत्कालीन मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे दीपाली चव्हाण यांनी अनेकवेळा विनोद शिवकुमार याची तक्रार केली होती. मात्र तक्रार करून देखील कारवाई करण्यात न आल्याने, दीपाली चव्हाण यांनी निराश होऊन आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप आहे. याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे या करत आहेत. प्रज्ञा सरवदे या १९८९ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत, त्यांनी सुरुवातीला 6 वर्ष पश्चिम बंगालमध्ये नोकरी केली. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
हेही वाचा -सचिन वाझे यांची 'ही' मागणी विशेष एनआयए न्यायालयाने नाकारली