अमरावती - पश्चिम विदर्भात सर्वाधिक लागवड ही सोयाबीनच्या पिकाची होते. मागील वर्षी ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे त्याचा परिणाम बीजोत्पादनावर देखील झाला आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील तब्बल दीड हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी आता पुढे आल्या आहेत. त्यापेक्षा जास्त संख्या ही तक्रार न करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. परिणामी आता पश्चिम विदर्भातील हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी अटळ आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत पावसाळा हा या वर्षी १० दिवस अगोदर सुरू झाला. पश्चिम विदर्भातील अनेक तालुक्यात पाऊस धो-धो बरसला असला, तरिही अनेक तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने शेतात महागडे बियाणे रुजवले. परंतु, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीत मात्र कमालीची वाढ झाली आहे. कृषी विभागाकडे येणाऱ्या तक्रारीच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बियाणे न उगवल्याच्या तक्रारीमध्ये सर्वाधिक तक्रारी या महामंडळाच्या महाबीज या बियाणाबरोबर अनेक नामांकित कंपनीची नावे सुद्धा आहेत.
सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी... हेही वाचा..."बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले.. मग इतर रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का?"
राज्य सरकारकडून या बियाणांसंदर्भात पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, नुकसान झालेल्या क्षेत्रफळाच्या तुलनेत पंचनामा करणाऱ्या कृषी विभागाचे पथक अल्प असल्याने शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्त सोयाबीन बियाण्याचे पंचनामे रखडत आहे. त्यामुळे पंचनामा झाला नाही, तर मग दुबार पेरणी केव्हा करावी, अशा द्विधा मनस्थितीमध्ये पश्चिम विदर्भातील शेतकरी अडकले आहेत.
मागील वर्षी ऐन काढणीला आलेले सोयाबीन अवकाळी पावसाने खराब झाले. त्यामुळे उत्पादन तर घट झाली परंतु त्याची पत खालावल्याने बाजार भाव मिळाला नाही. तर अद्यापही लाखो शेतकऱ्यांच्या घरी कापूस खरेदीविना पडून आहे. अशा परिस्थितीत उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. परंतु, बियाणे वांझोटे निघाल्याने आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. आता पुन्हा या पेरणीसाठी कुठून पैसे आणावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पश्चिम विदर्भात सोयाबीन उगलेच नसल्याच्या तक्रारीत झपाट्याने वाढ... हेही वाचा...'जातीय तेढ नष्ट करणे आणि सर्वांना शिक्षण देणे, हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली'
यावर्षी खरीप हंगामासाठी पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील सरासरी ३२ लाख २८ हजार एवढ्या क्षेत्रफळावर पेरणी अपेक्षित होती. त्यापैकी या पाच जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पश्चिम विदर्भात दरवर्षी सोयाबीन पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावर्षी सुद्धा जवळपास ९ लाख ६६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. तर त्या पाठोपाठ ७ लाख ५७ हजार हेक्टरवर कापसाची लागवडही केल्या गेली आहे.