अमरावती - काही दिवसांपूर्वी अकोला येथून अमरावतीला घरी परतलेल्या एका युवकाचा कोरोना चाचणी अहवाल आज (बुधवार) प्राप्त झाला. ज्यात हा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. परंतु, या मुलाचे वडील लॉकडाऊनमध्ये परिसरातील अनेकांच्या घरी जाऊन हेअर कटिंग आणि दाढी करत होते. त्यामुळे अमरावतीच्या प्रभा कॉलनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीतील प्रभा कॉलनी येथील एका 22 वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. हा युवक मध्यंतरी अकोला येथे गेला होता. त्यामुळे त्याचे स्वॅब नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. आज (बुधवार) प्राप्त झालेल्या अहवालात त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. या युवकांच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय असून या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी परिसरातील अनेकांच्या घरी जाऊन केस कापणे आणि दाढी करणे, ही कामे केली आहेत.