अमरावती -प्रत्येक व्यक्तीच्या आड कुठली तरी कला लपलेली असते अशा सुप्त कलेला कुठेतरी वाव मिळावा या उद्देशाने अमरावतीत हौस म्हणून गाणे म्हणणाऱ्या मंडळींनी एकत्रित येऊन क्लब स्थापन केला. आपल्या मित्रमंडळींसोबत गाणे म्हणण्याची हौस भागवतानाच अमरावती शहरातील हौशी गायकही या क्लबसोबत जोडले जात आहेत. विदर्भातील हा पहिला प्रयोग असून चला गाणी म्हणू या, असे म्हणत अनेक हौशी गायक या क्लबच्या माध्यमातून आपली गीत गाण्याची हौस भागवत आहेत.
अशीच झाली क्लबची स्थापना -अमरावती शहरात मागील 17 वर्षांपासून काही हौशी गायक एकत्रित येऊन दरवर्षी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करत होते. शहरातील हॉटेल व्यवसायिक चंद्रकांत पोपट यांनी या साऱ्या हौशी गायकांना जत सतरा वर्षांपासून एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला यश येत गेले विशेष म्हणजे महापालिकेतील अधिकारी असो किंवा पोलीस पोलीस दलातील अधिकारी ज्यांना गाणी म्हणण्याची हौस होती असे सारे जुळत गेले. अमरावतीचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत सातव, महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे हेसुद्धा आपल्या गाण्याची हौस भागवण्यासाठी चंद्रकांत पोपट यांच्याशी जुळले. चंद्रकांत पोपट यांच्या हॉटेलच्यावर असणाऱ्या एका खोलीतच चार-पाच मंडळी एकत्र येऊन आपल्या गाण्याची हौस भागवत होते. मात्र, चंद्रकांत पोपट यांनी अहमदाबादमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी स्थापन केलेल्या गाण्याच्या क्लब प्रमाणेच अमरावतीतही राजापेठ पोलीस ठाण्याच्या मागे मे महिन्यात 'संगीत साधना कराओके' या नावाने स्पेशल क्लब अमरावतीकरांचा सेवेत सुरू केला. आज शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह, विविध क्षेत्रात काम करणारे हौशी गायक मंडळी या क्लब सोबत जुळत आहेत.
कोरोना काळात अनेकांनी जोपासली हौस -कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक जण घरी असताना त्यांनी आपली गाण्याची हौस मोबाईलमध्ये असणाऱ्या विविध ॲप्सच्या माध्यमातून जोपासली. टाळेबंदीनंतर पुन्हा सर्वजण आपापल्या कामात रमले. मात्र, आता अमरावती शहरात सुरू झालेल्या खास गाण्याच्या क्लबमुळे पुन्हा एकदा हौशी गायकांना आपल्या गाण्याची कला जोपासण्यासाठी खास असे दालन उपलब्ध झाले आहे.