अमरावती -अमरावती लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा खासदार राहिलेले आनंद पुढे ( Amaravati Shivsena Leader Anant Gudhe ) यांनी सांगितले की, जी माणसं ऑटो रिक्षा चालवत होती, पान टपरी चालवत होते अशा व्यक्तींना शिवसेनेने मोठे केले. असे असतानाही या लोकांनी बंडखोरी करणे योग्य नव्हते. यापूर्वी देखील शिवसेनेत फूट पडली होती. छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. आज छगन भुजबळ दिसत आहेत, मात्र त्यांच्यासोबत गेलेले शिवसैनिक कुठेच दिसत नाहीत. नारायण राणे हेदेखील शिवसेनेतून फुटून बाहेर निघाले. आज नारायण राणे दिसत आहेत. मात्र त्यांच्यासोबत गेलेले अकरा जण कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे या बंडखोरीचाही मोठा फायदा बंडखोरांना मिळेल, असे मला वाटत नाही. आता अडीच वर्षासाठी बंडखोर सत्तेत निश्चितपणे येतील. मात्र अडीच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जाताना जनता या बंडखोरांना निश्चितच धडा शिकवणार, असे देखील अनंत गुढे यांनी म्हटले आहे.
पक्षसंघटनेतच्या कारभारावरही घेतला अक्षेप -पक्षप्रमुखांनी देखील पक्षाकडे तसेच पक्ष संघटनेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही असा आक्षेप देखील अनंत गुढे यांनी नोंदविला. मुंबईनंतर, संभाजीनगर अमरावती या ठिकाणी शिवसेनेचे मोठे कॅडर होते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शिवसैनिकच आहे. अमरावती जिल्ह्यात मी खासदार असताना भाजपचे तीन आमदार तसेच शिवसेनेचे तीन आमदार होते. जिल्हा परिषद, महानगरपालिका या ठिकाणी आमचेच संख्याबळ अधिक होते. मात्र आता परिस्थिती अत्यंत विपरीत आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक इतक्या मोठ्या धक्कादायक प्रकरणानंतरही समोर येऊन बोलायला तयार नाहीत. पक्षाने मला अमरावती जिल्ह्याची जबाबदारी दिली असती तर अमरावती जिल्ह्यात आज निश्चितपणे झाल्या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटलेली दिसली असती. मी आज देखील जिल्ह्यात शिवसेना मोठ्या ताकदीने उभी करू शकतो. मात्र जे कार्यकर्ते तळमळीने काम करू इच्छितात त्यांना पक्ष जबाबदारीच देत नाही अशी खंत अनंत गुढे यांनी व्यक्त केली.