अमरावती-शहरातील वडाळी परिसरातील बांबू उद्यान हे अप्रतिम आहे. या ठिकाणी देशभरातील विविध प्रजातींचे बांबू आहेत. अमरावती प्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रात बांबू उद्यान निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. याची जबाबदारी अमरावती येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या बांबू उद्यानाची वनमंत्र्यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी केल्यावर ते भारावून गेले होते.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड दोन दिवसांच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. शुक्रवारी मेळघाटचा दौरा केल्यावर शनिवारी सायंकाळी ते अमरावती शहरातील वडाळी परिसरात असणाऱ्या वनविभागाच्या बांबू उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी वनविभागाच्या बचाव पथकाचा आढावा वनमंत्र्यांनी घेतला. मानवी वस्तीत शिरलेल्या वन्यप्राण्यांना सुखरूप वाचवून त्यांना जंगलात सोडणे. पिसाळलेल्या प्राण्यांना जखमी करून त्यांचा इलाज करणे यासाठी लागणारी विविध उपकरणे आदींची माहिती वनमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली.
बांबू उद्यानाची पाहणी करताना सर्वप्रथम त्यांनी बांबू संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू पाहून वनमंत्री चकित झालेत. बांबू उद्यानात असलेल्या जवळपास 75 प्रकारच्या विविध बांबूंची माहिती यावेळी वनमंत्र्यांनी जाणून घेतली. वडाळी बांबू उद्यान येथे जगभरातील विविध प्रजातीचे बांबू आहेत. या बांबूंची माहिती घेतल्यावर वनमंत्र्यांनी बांबू उद्यानातील कॅक्टस उद्यानाला भेट दिली. विविध प्रकारच्या कॅक्टसच्या प्रजाती आणि त्यांचे छानसे उद्यान पाहून वनमंत्री भारावून गेले.