अमरावती -महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कुरघोडीचे राजकारण करत आहे. सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत पटत नसताना हे जनतेचे काही भले करू शकत नाहीत. खरं तर शिवसेनेला टिकायचे असेल तर दोन्ही काँग्रेसला दूर सारून भाजपशी युती करायला हवी. आताही वेळ गेलेली नाही, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरावतीत व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाच्या दिवंगत कार्यकर्त्याना श्रद्धांजली वाहण्यास त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रामदास आठवले अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीसांना अडीच वर्षे संधी मिळावी -
उद्धाव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवं होतं. आता अडीच वर्षे पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दूर सारून भाजपशी युती करावी. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडाला अडीच वर्षे पूर्ण होताच पुढील अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळायला हवी, असे रामदास आठवले म्हणाले. शिवसेनेसाठी हा योग्य निर्णय ठरेल हवं तर मी स्वतः खासदार संजय राऊत यांच्याशी याबाबत बोलेन. दोन्ही पक्षात मध्यस्थी करण्याची माझी तयारी असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.
हे ही वाचा -सीरमचे डॉ. सायरस पूनावालांचा केंद्राला 'डोस', म्हणाले...
नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट नेते -
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोत्कृष्ट नेते आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विविध क्षेत्रात विकासाची उंच झेप घेत आहे, असे म्हणत असतानाच रामदास आठवले यांनी सध्या पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडरचे जे दर वाढले आहे तो जागतिक बाजारपेठेचा परिणाम असल्याचे म्हटले. ही महागाई कमी करण्यास केंद्र सरकार येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आल्याचे रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन ऐक्य सध्या अशक्य -
रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही माझ्यासह अनेकांची इच्छा आहे. मी कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण खाण्यापुरते आहे. सध्या रिपब्लिकन पक्षांची परिस्थिती गंभीर असून सध्याच्या काळात रिपब्लिकन ऐक्य अशक्य आल्याचे रामदास आठवले म्हणाले.