अमरावती -राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महिनाभरापासून गदारोळ सुरू असताना आज अमरावती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजापेठ उड्डाणपुलावर अटी व नियम तपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.
बसपाच्या प्रस्तावाला भाजपचे अनुमोदन -
राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी अनधिकृत पुतळा बसविल्यामुळे वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून आर्थिक तसेच हवी ती मदत घेऊन महापालिकेच्यावतीने राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, असा प्रस्ताव मांडला. भाजपचे गटनेते सुनील काळे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात कुठलीही हरकत नसावी, असे सभागृहासमोर म्हटले.
नियम आणि अटी, शर्ती तपासा -
राजापेठ येथील उड्डाणपूल हा रेल्वे प्रशासनाने उभारला आहे. या उड्डाणपुलावर पुतळा बसवता येतो का, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचे काय नियम आहेत किंवा काही अटी-शर्ती आहेत का? याचा अभ्यास करण्यात यावा. यासह महामार्ग प्राधिकरणाच्याही अटी, शर्ती तपासून मान्यता घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात यावा, असे भाजपचे नगरसेवक तुषार भारतीय म्हणाले.