अमरावती- आधीच उशीरा सुरू झालेल्या पावसाने गेल्या दहा दिवसापासून दडी मारली आहे. अशातच आता 22 जुलैनंतरच विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अमरावतीतील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख अनिल बंड यांनी मंगळवारी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपवल्या. महागाचे बियाणे शेतात ओतले. परंतु, गेल्या दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे. त्यात आणखी हवामान खात्याने 22 जुलैनंतरच विदर्भात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. अमरावती जिल्ह्यात 95 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. पाऊस नसल्याने उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे पिके करपत चालली आहे. शिवाय धरणेही कोरडीच आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे.